Pimpri : डोळ्यांची प्रतिबंधात्मक काळजी महत्वाची अन्यथा विविध नेत्रविकारांना आमंत्रणच -डॉ. श्रुतिका कांकरिया

एमपीसी न्यूज – प्रत्येक व्यक्तीने आपल्या डोळ्यांच्या काळजीबाबत कायम सजग राहणे गरजेचे आहे. काही त्रास होण्याआधीच योग्य वेळी योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन वेळोवेळी उपाय करणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन नामवंत नेत्ररोगतज्ञ डॉ. श्रुतिका कांकरिया यांनी केले. डोळ्यांची प्रतिबंधात्मक काळजी महत्वाची अन्यथा विविध नेत्रविकारांना आमंत्रणच आहे, असेही त्या म्हणाल्या.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे सावरकर सदन, निगडी प्राधिकरण येथे रविवारी (दि.1) नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी डॉ. कांकरिया यांनी उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विनोद शहा, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन नायर, कार्याध्यक्ष भास्कर रिकामे, सचिव प्रदीप पाटील व महिला विभागाच्या प्रमुख निवेदिता कच्छवा उपस्थित होते.

मधुमेह असणाऱ्या लोकांनी डोळ्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे आणि ही काळजी वयाच्या 30 ते 40 वयापासूनच घेतली पाहिजे. तसेच लहान मुले व विद्यार्थी यांनी देखील वेळोवेळी डोळ्याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. आपल्या भोवतालचे सुंदर जग पाहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतःहुनच डोळा या आपल्याला दैवी देणगी असलेल्या सुंदर अवयवाची जपणूक करणे गरजेचे आहे, असे डॉ. श्रुतिका कांकरिया यांनी सांगितले.

भाषणानंतर निगडी प्राधिकरण परिसरातील 346 नागरिकांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने आयोजित केलेल्या या नेत्र तपासणी शिबिरात लहान मुले, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांच्या डोळ्यांची प्रार्थमिक तपासणी केली गेली. आलेल्या शिबिरार्थींना डोळ्याचा क्रमांक काढून देण्यात आला.

मधुमेही व मोतीबिंदु असणाऱ्या रुग्णांची विशेष तपासणी केली गेली. त्यांना योग्य सल्ला देखील डॉ. श्रुतिका कांकरिया यांच्या टीम कडून दिला गेला. या शिबिरातील डोळ्यांच्या सर्व तपासण्या डॉ. श्रुतिका कांकरिया यांच्या पुणे व महाराष्ट्रातील नामवंत अशा एशियन आय हॉस्पिटलद्वारे करण्यात आल्या. मधुमेह व नेत्रविकार असे दोन्ही आजार असणाऱ्या व्यक्तींस या शिबिरात विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव प्रदीप पाटील यांनी केले. निवेदीता कच्छवा यांनी सूत्रसंचालन केले. तर, मंडळाचे कार्याध्यक्ष भास्कर रिकामे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.