Pimpri : आवास योजनेच्या गृहप्रकल्पांना गती, पर्यावरण दाखल्याची अडचण दूर

4602 घरे बांधणीचा मार्ग मोकळा

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राबविण्यात येणा-या गृहप्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकताच या प्रकल्पाचा पर्यावरण दाखला मिळाल्याने रखडलेल्या प्रकल्पाला गती मिळेल, असा दावा महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील बेघर व्यक्तींसाठी महापालिकेने वेगवेगळ्या भागात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गृहप्रकल्प उभारण्याचा संकल्प केला आहे. केंद्र सरकारतर्फे ‘सर्वांसाठी घरे 2022’ या संकल्पनेवर आधारित पंतप्रधान आवास योजना अभियान राबविण्यात येत आहे. महापालिका मंजूर विकास आराखड्यात शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूयुएस) आणि बेघरांसाठी घरे (एचडीएच) या योजनांसाठी जागांची आरक्षणे आहेत.

या जागा ताब्यात आल्यानंतर त्याठिकाणी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहराच्या विविध भागात 10 ठिकाणी 9 हजार 458 सदनिका बांधण्याचे नियोजन आहे. त्यापैकी च-होली येथे 1442, रावेतमध्ये 934, मोशी-बो-हाडेवाडीमध्ये 1288, पिंपरीत 370, तर आकुर्डीत 568 अशा एकूण 4602 सदनिका उभारण्याचे प्रस्तावित आहे. महापालिकेने या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून आधी राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला.

राज्य सरकारच्या तांत्रिक समितीने नोव्हेंबर 2017 मध्ये या अहवालांना मंजुरी देऊन ते केंद्र सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविले. केंद्रानेही या प्रकल्प अहवालांना मंजुरी दिली आहे. मात्र, दरम्यानच्या काळात या प्रकल्पांना पर्यावरण दाखला न मिळाल्याने तांत्रिक अडचण उद्भवली. प्रकल्पांची कामे ‘जैसे थे’ ठेवावी लागली. त्यामुळे दोन वर्षे हे काम रखडले होते. महापलिकेने पाठपुरावा करून या प्रकल्पांसाठी पर्यावरण दाखला मिळविला असून, प्रकल्पांचे काम आता पुन्हा सुरु करण्यात आले आहे.

पिंपरीतील प्रकल्पाची आघाडी

नेहरूनगर, पिंपरी या शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रकल्पाचे काम मोठ्या वेगात सुरु आहे. येथे 370 फ्लॅट बांधले जाणार आहेत. सध्या सहा स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. एकूण पाच प्रकल्पांपैकी नेहरूनगर येथील प्रकल्पाने कामात आघाडी घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.