Pimpri: खासगी रुग्णालये हाउसफुल्ल; रुग्णांची हेळसांड, नागरिक हवालदिल

Private hospitals housefull; Patient care, civic concern : खासगी रुग्णालये हाउसफुल्ल; रुग्णांची हेळसांड, नागरिक हवालदिल

खासगी रुग्णालयांवर नाही महापालिकेचे नियंत्रण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबरोबरच विविध साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे रुग्णालये कमी पडू लागली आहेत.  जुलैच्या सुरुवातीलाच खासगी रुग्णालये ‘हाउसफुल्ल’ झाली आहेत. खासगी रुग्णालयात गेटवरुनच रुग्णांना परत पाठविले जाते. तसेच ‘No beds available’ असे  सांगितले जाते. यामुळे  रुग्णांची हेळसांड होत असून नागरिक हवालदिल झाले आहेत. खासगी रुग्णालयांवर महापालिकेचे कोणतेही नियंत्रण नसताना दिसून येत आहे. महापालिकेने खासगी रुग्णालयाबाबत काहीतरी तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शहरातील बाधितांची संख्या चार हजाराच्या उंबरठ्यावर आहे. महिनाअखेर दहा हजार रुग्ण होण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.

पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार डोकेवर काढतील. मागील दोन दिवसांपासून शहरात पोट दुखणे, जुलाब, अतिसाराचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत.

महापालिका रुग्णालयात प्राधान्याने कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तर, शहरातील खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाल्याचे सांगितले जात आहे. गेटवरुनच रुग्णाला परत पाठविले जात आहे. रुग्णाचे नातेवाईक रुग्णालय प्रशासनाच्या  मिनतवा-या, पाया पडत आहेत. विनंत्या करत आहेत.

परंतु, खासगी रुग्णालय चालकांकडून दाद दिली जात नाही. यामुळे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. त्याचा प्रत्यय आजच आला. एका वयोवृद्ध महिलेला चार खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, एकाही रुग्णालयाने दाखल करुन घेतले नाही. अखेरीस या रुग्णालयाला पुण्यात दाखल करावे लागले.

शहरातील खासगी रुग्णालयांवर महापालिकेचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. परंतु, महापालिका प्रशासन हातावर हात करुन बसले आहे.  जुलैच्या पहिल्या  आठवड्यात अशी वेळ येत असेल, तर पुढे रुग्णांची काय अवस्था होईल. खासगी रुग्णालये दाखल करुन घेतील का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे महापालिकेने काहीतरी तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.

खासगी रुग्णालय चालकांची असहकार्याची भूमिका !

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे साथीचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये देखील वाढ होत आहे. पावसाळ्यात साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होते. परंतु, खासगी रुग्णालयांकडून आत्तापासून रुग्णाला दाखल करुन घेतले जात नाही.

अगोदर कोरोनाचा रिपोर्ट मागविला जातो. त्याशिवाय रुग्णालयात घेतले जात नाही. त्यामुळे इतर आजाराच्या रुग्णांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर देखील महापालिकेने खासगी रुग्णालय चालकांना सूचना देण्याची मागणी केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.