Pimpri: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या 31 मार्चपर्यंत बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. शहरातील रुग्णांची संख्या बारा झाली. त्या पार्श्वभूमीवर ट्रॅव्हल्स असोसिएश पिंपरी चिंचवड शहरने ऍडव्हान्स बुकींग आणि प्रवासी वाहतूक उद्या (शनिवार) पासून 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे संघटनेचे सचिव चंद्रकांत दानवले यांनी सांगितले.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तु सोडून शहर ‘शट डाऊन’ केले आहे. त्यानुसार ट्रॅव्हल्स असोसिएशनने सर्व पदाधिकारी आणि सदस्यांची बैठक घेत ऍडव्हान्स बुकींग, ट्रॅव्हल्स कार्यालये आणि बसगाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष बंडूराज काळभोर, सचिव चंद्रकांत दानवले, उपाध्यक्ष सचिन सोनकुळे, खजिनदार संतोष चिटकोट, सदस्य अशोक चौधरी, रणजित फुले, संतोष जाधव, प्रकाश गदिया,  संग्राम येवले आदी पदाधिकाऱ्यांसह सुमारे 40 ट्रॅव्हल्स कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

‘शहरामधून बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंतच्या बुकींगनुसार प्रवासी वाहतूक करण्यात आली. आता उद्यापासून 31 मार्चपर्यंत सर्व ट्रॅव्हल्स कार्यालये, ऍडव्हान्स बुकींग आणि बसगाड्या बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.