Pimpri: ‘खासगी ट्रॅव्हल्सच्या बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणा’

आमदार लक्ष्मण जगताप यांची पोलिसांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख रस्त्यांवरील खासगी ट्रॅव्हल्स वाहनांची अवैध वाहतूक व पार्किंग समस्येमुळे नागरिकांना वाहतूककोंडी आणि अपघातांना सामोरे जावे लागत आहे. खासगी ट्रॅव्हल्सची बेशिस्त पार्किंग आणि असुरक्षित वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका व वाहतूक पोलिसांच्या संयुक्त समन्वयाने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.

याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना पत्र दिले आहे. यापूर्वीच्या पोलीस आयुक्तांनी खासगी ट्रॅव्हल्सच्या वाहतूक आणि पार्किंगसाठी काही नियम बनवून त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. मात्र त्यांच्या बदलीनंतर वाहतूक विभागाने या नियमांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख रस्त्यांवर बेशिस्तपणे आणि वाहनांना अडथळा ठरेल अशा पद्धतीने खासगी ट्रॅव्हल्स उभ्या असतात.

या खासगी ट्रॅव्हल्सधारकांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर आपली मक्तेदारी निर्माण केलेली आहे. नवी सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदान, भोसरी, निगडी, चिंचवड स्टेशन, काळेवाडी, वाकड अशा सर्वच भागात ही परिस्थिती दिसून येत आहे. महत्त्वाचे रस्ते, प्रमुख चौक, वर्दळीचे रस्ते, अंतर्गत मोठ्या रस्त्यांचा अर्ध्याहून अधिक भाग या खासगी ट्रॅव्हल्सनी व्यापलेला असतो. शहरातील महामार्ग अथवा मोकळ्या जागांमध्ये खासगी ट्रॅव्हल्सची पार्किंगची व्यवस्था करून शहरातील रस्ते वाहतूककोंडी आणि अपघातांपासून मुक्त करत वाहनधारकांना दिलासा द्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.