Pimpri : वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करून वृक्षसंवर्धनास चालना द्या; स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे आवाहन

एमपीसी न्यूज – वटपौर्णिमेदिवशी वडाच्या फांद्यांची पूजा न करता वडाच्या झाडाची पूजा करावी. फांद्याची पूजा करण्यासाठी वडाच्या झाडांची कत्तल करावी लागते. झाड देखील सजीव आहे. आपला सण साजरा करण्यासाठी एका सजीवाची कत्तल करणे योग्य नाही. त्यामुळे फांद्यांऐवजी झाड पुजायला हवे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाकडून करण्यात आले आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सवाला महत्त्वाचे स्थान आहे. या सर्व उत्सवांची रचना ही शास्त्रीय दृष्टिकोनातून, पर्यावरण व निसर्ग रक्षणाला पूरक अशीच करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रत्येक वनस्पती व प्राणी यांचे निसर्ग चक्रातील स्थान अबाधित ठेवण्यासाठी सण-उत्सवांच्या निमित्ताने पूजेचा अग्रमान दिलेला आहे. प्रसंगानुरूप गायवासरु, बैल, नाग, वड, पिंपळ, उंबर अशी सर्वच जीवसृष्टी वाचविण्याचा यातून प्रयत्न करण्यात आला आहे.

  • वडाच्या झाडापासून मिळणाऱ्या प्राणवायूचा व निसर्ग सान्निध्याचा लाभ मिळावा. यासाठी वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. ती आजही आवश्यक आहे. तसेच सर्व महिला यानिमित्ताने एकत्र येतील. महिला एकत्र आल्याने विचारांची देवाणघेवाण होईल. वडाच्या झाडाची गरज यातून अधोरेखित होते आणि त्यातून आपोआपच संवर्धन होते. यासाठी परिसरातील मोठ्या वडाच्या झाडाची पूजा करणे अपेक्षित आहे.

मात्र, दुर्दैव हे की, मागील काही वर्षांपासून महिलांनी नवीन पायंडा पडला आहे. केवळ प्रथा म्हणून शहरी परिसरात वडाची फांदी घरी आणून गुपचूप पूजा केली जाते. अशी पूजा ही निसर्गाला मान्य नाही. यामुळे वडाचे जतन होण्याऐवजी त्याची अमानुषपणे कत्तल होत आहे. दुसऱ्या दिवशी रस्त्यावर फांद्यांचा खच पडलेला दिसतो. यातून निसर्गाचे रक्षण करण्याऐवजी त्याचे भक्षण केले जात आहे.

  • येत्या वटपौर्णिमेला गृहिणींनी आपापल्या परिसरातील वडाच्या झाडाची एकत्रीतपणे पूजा करावी. नवीन वडांच्या झाडांची लागवड करावी. अगदीच अडचण असेल तर वडाच्या झाडाच्या चित्राची पूजा करावी. परंतु कोणत्याही परिस्थितीत फांद्यांची पूजा करुन वडाच्या झाडांच्या तोडीस प्रोत्साहन देऊ नये, असे स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्ग मित्र व महिला विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

सावरकर मंडळाच्या महिला विभागामार्फत दरवर्षी 16 जून रोजी वृक्षारोपण करण्यात येते. त्याप्रमाणे यावर्षी देखील रविवारी (दि. 16) दुपारी चार वाजता घोरावडेश्वर डोंगरावर वडाची झाडे लावून त्यांची पूजा केली जाणार आहे. या उपक्रमात शहरातील नागरिकांनी सहभागी होऊन घोरावडेश्वर डोंगरावर अथवा आपल्या परिसरात एक झाड लावावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.