Pimpri : सत्ताधा-यांचे सभाशास्त्रांचे अज्ञान अन् झोपलेल्या विरोधकांमुळे शहरवासीयांवर करवाढीचे संकट

नगरसेवक विषयपत्र देखील वाचत नाहीत ?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला सभाशास्त्राचे किती ज्ञान आहे दिसून आले. तर, विरोधातील राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी झोपेचे सोंग घेतले. एका नगरसेवकाने देखील करांचे दर 20 फेब्रुवारी 2020 रोजी किंवा तत्पूर्वी निश्चित करणे बंधनकारक असल्याचे सांगितले नाही. त्या विषयाला वाचा फोडली नाही. करवाढीवर निर्णय घेऊन सभा तहकुबीची सूचना मांडली नाही. 20 फेब्रुवारीची सभा तहकूब केल्याने कराचे दर निश्चित झाले नसल्याने आयुक्तांच्या प्रस्तावाची अमंलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे. सत्ताधा-यांचे सभाशास्त्राचे अज्ञान आणि झोपलेल्या विरोधकांमुळे पिंपरी-चिंचवडकरांवर करवाढ, पाणीपट्टीवाढ लादली आहे. एकाचवेळी अडीच ते तीनपटीने करवाढ केली आहे.

महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार करांचे दर 20 फेब्रुवारी 2020 रोजी किंवा तत्पूर्वी निश्चित करणे बंधनकारक आहे. परंतु, सत्ताधारी भाजपला त्याचा विसर पडला. पक्षांतर्गत राजकारणात भाजपने फेब्रुवारी महिन्याची महासभा 26 फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर टाकली. यामुळे मालमत्ताकर आणि पाणीपट्टी वाढीच्या आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या प्रस्तावांची आपसूकच अंमलबजावणी होणार आहे. मालमत्ताकर वाढीचा फटका 2 लाख 54 करदात्यांना तर, पाणीपट्टी दरवाढीचा फटका 1 लाख 10 हजार नळजोडधारकांना बसणार आहे. भाजपच्या पक्षीय राजकारणाचा फटका पिंपरी-चिंचवडकरांना बसणार आहे.

विषयपत्रिकेवर महाराष्ट्र महापालिका अधिनियमा मधील कलम 99 अन्वये करांचे दर 20 फेब्रुवारी ला किंवा तत्पूर्वी निश्चित केले पाहिजेत असे स्पष्ट लिहिले आहे. त्याकडे सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील एकाही नगरसेवकाचे लक्ष गेले. कोणत्याही नगरसेवकाने करवाढीच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याची मागणी केली नाही.

भाजपने करवाढीचा कोणताही विचार न करता महासभा लांबणीवर टाकली. करवाढीवर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे करवाढ, पाणीपट्टीवाढ लादली आहे. शहरातील 2007 पूर्वीच्या 2 लाख 54 हजार मालमत्तांच्या करात तब्बल अडीच ते तीनपटीने वाढ होणार आहे. एकाचेवळी एवढी मोठी करवाढ होणार असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ”भाजपने कोणालाही विश्वासात न घेता सभा तहकूब केली. महासभा तहकुबीला आमचा विरोध होता. परंतु, भाजपने बहुमताच्या जोरावर महासभा तहकूब केली. भाजपमुळेच करवाढ लादली आहे”.

सभागृह नेते नामदेव ढाके म्हणाले, ”पाणीपट्टीवाढ मागे घेता येईल. कर कमी करण्यासंदर्भात आयुक्तांसोबत चर्चा करत आहोत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.