Pimpri : मिळकत कर सवलत योजनेला 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

नागरिकांना महापालिकेच्या 16 विभागीय कार्यालयामध्ये रोख, धनादेश, डीडीद्वारे मालमत्ता कराचा भरणा करता येईल. : property tax relief scheme extended till 31st August

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करता आला नाही. तसेच कर सवलत योजनेचा लाभ घेता आला नाही. महापालिकेचे आर्थिक चक्रही बिघडले आहे. त्यामुळे महापालिकेने सामान्य करातील सवलत योजनेला आणखी एक महिना मुदतवाढ दिली आहे. मालमत्ताधारकांना आता 31 ऑगस्ट 2020 पर्यंत योजनेचा लाभ घेता येणार आहे.

याबाबतची माहिती कर संकलन विभागाचे प्रशासन अधिकारी रमेश वस्ते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

महापालिकेमार्फत 30 जून पूर्वी थकबाकीसह दोन्ही सहामाहीची संपूर्ण मिळकत कर बिलांची रक्कम आगाऊ भरणा करणा-या मालमत्ताधारकांना सवलत दिली जाते.

माजी सैनिकांच्या नावे असलेल्या मालमत्ता, फक्त महिलांच्या नावे असलेल्या मालमत्ता, 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या नि:समर्थ मालमत्ताधारकाच्या मालमत्तांना सामान्य कराच्या चालू मागणीत 5 ते 50 टक्क्यापर्यंत सवलत देण्यात येते.

कोविड 19 चा प्रादुर्भाव असल्याने मालमत्ताधारकांना या कालावधीत सामान्य करातील सवलत योजनेचा लाभ घेता आला नाही.

या मालमत्ताधारकांना सामान्य करातील सवलत योजनेचा लाभ मिळावा, यासाठी योजनेला यापूर्वी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता पुन्हा 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

याशिवाय जे मालमत्ताधारक थकबाकीसह (अवैध बांधकाम शास्तीकराची रक्कम वगळून) संपूर्ण मालमत्ताकराची एक रक्कमी 100 टक्के भरणा करतील. त्यांना आकारण्यात आलेल्या महापालिका विलंब दंड रकमेच्या 90 टक्के सवलतीच्या अभय योजनेसही 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नागरिकांना महापालिकेच्या 16 विभागीय कार्यालयामध्ये रोख, धनादेश, डीडीद्वारे मालमत्ता कराचा भरणा करता येईल. तसेच महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

नागरिकांनी 31 ऑगस्ट 2020 पूर्वी एक रकमी मालमत्ताकराचा भरणा करुन सामान्य करातील विविध सवलत योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर संकलन विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.