Pimpri : ‘सोशल मिडीया एक्स्पर्ट’चा प्रस्ताव तहकूब

एमपीसी न्यूज – भाजप सदस्यांच्या विरोधामुळे फेटाळलेला आणि पुन्हा स्थायी समिती समोर आणलेला ‘सोशल मिडीया एक्स्पर्ट’ नेमणुकीचा प्रस्ताव तहकूब केला आहे. या प्रस्तावाला अनेक सदस्यांचा विरोध आहे. त्यामुळे स्थायी समितीने प्रस्ताव तहकूब करणे पसंत केले. माहिती व तंत्रज्ञान विभागाने चलाखी करत ‘सोशल मिडीया एक्स्पर्ट’ नेमण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात यावेत अशी दुरुस्ती करुन तोच प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला होता.

महापालिकेतर्फे राबविण्यात येणा-या विविध प्रकल्पांच्या कामकाजांसाठी शहर परिवर्तन कार्यालय (सिटी ट्रान्फॉर्मेशन ऑफीस तथा सीटीओ) स्थापन करण्यात आली आहे. या कार्यालयामार्फत विविध माध्यमांचा उपयोग करून सिटीझन एन्गेजमेंट कार्यक्रम आणि सोशल मिडीया कॅम्पेन राबविण्यात येणार आहे. शहराच्या विकासात नागरीकांना अंतर्भूत करून घेणे, नागरिकांची, तज्ज्ञांची मते जाणून घेवून सर्वेक्षण करणे आदी कामांचा समावेश आहे. त्यासाठी सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येत आहे.

हे कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘सोशल मिडीया एक्स्पर्ट’ म्हणून अमोल देशपांडे यांची नेमणूक केली जाणार होती. सहा महिने कालावधीसाठी त्यांची नेमणूक असणार होती. देशपांडे यांना दरमहा सत्तर हजार रुपये इतके मानधन देण्यात येणार होते. तथापि, सत्ताधारी भाजपमध्ये या विषयावरुन मतमतांतरे होती. अनेक भाजपच्या स्थायीतील सदस्यांनी प्रस्तावाला विरोध केला. त्यामुळे 28 फेब्रुवारीच्या सभेत हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता.

माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख निळकंठ पोमण यांनी चलाखी करत ‘सोशल मिडीया एक्स्पर्ट’ नेमण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात यावेत अशी दुरुस्ती केली. तोच प्रस्ताव पुन्हा स्थायी समिती समोर मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र, स्थायी समितीने तो प्रस्ताव तहकूब ठेवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.