pimpri: जीवाची पर्वा न करता ‘कोरोना’विरोधात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच द्या – नामदेव ढाके

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय, आरोग्य तसेच इतर विभागातील कर्मचा-यांच्या नेमणूका केल्या आहेत.  हे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी दिवसरात्र काम करत आहेत. त्यामुळे या कर्मचा-यांना विमा सुरक्षा कवच लागू करावे अशी सूचना सभागृह नेते नामदेव ढाके यांनी आयुक्तांना केली आहे.

सभागृह नेते ढाके म्हणाले, कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांसह नेमणूक केलेल्या कर्मचा-यांचा कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या व संशयीत रुग्णाशी थेट संपर्क येत असतो. त्याचप्रमाणे सर्व्हेसाठी नेमणूक केलेल्या कर्मचा-यांचा देखील थेट संपर्क येवू शकतो. त्यामुळे एखाद्या कर्मचा-याला कोरोनाचा संसर्ग होऊन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी या कर्मचा-यांना योग्य असे सुरक्षा कवच व प्रशासनाचा आधार असणे अत्यंत आवश्यक आहे.

त्यासाठी महापालिकेतील ज्या ज्या कर्मचा-यांच्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नेमणूका केल्या आहेत. त्यांच्या बाबतीत काही दुर्घटना घडल्यास त्यांना महापालिकेमार्फत सुरक्षा कवच म्हणून दुर्घटने पश्चात एक कोटी रक्कम द्यावी.  त्यांच्या वारसास महापालिका सेवेत नोकरी देणे अशा प्रकारची योजना तातडीने सुरु करावी. जेणे करुन या सर्व कर्मचा-यांना आधार व प्रोत्साहन मिळेल, असे ढाके म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.