Pimpri : कर्णबधिर आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा पिंपरीत निषेध

एमपीसी न्यूज – आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणा-या कर्णबधिर, मूकबधिर आंदोलकांवर पुणे पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जचा विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी निषेध केला. लाठीचार्ज करण्याचा आदेश देणा-यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या आंदोलनात नागरी हक्क सुरक्षा समितीचे मानव कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, मयूर जयस्वाल, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, संभाजी बिग्रेडचे वैभव जाधव, प्रहार अपंग संघटनेचे संजय भोसले, शेतकरी कामगार पक्षाचे हरिश मोरे, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते यांच्यासह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

पुण्यातील समाजकल्याण आयुक्तालयासमोर कर्णबधीर तरुणांचे सोमवारी आंदोलन सुरू होते. आपल्या विविध मागण्यांसाठी शेकडो कर्णबधिर तरुण रस्त्यावर उतरले होते. या कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. विविध शासकीय योजना आमच्यापर्यंत पोहचत नाहीत अशा विविध मागण्यांसाठी कर्णबधीर आंदोलन करत होते. पुणे पोलिसांनी ज्यांना ऐकायला येत नाही आणि बोलायला येत नाही अशा कर्णबधिर, मूकबधिर आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला आहे. इतिहासात पहिल्यांदाच कर्णबधिर मुलांवर लाठीचार्ज झाला आहे. कर्णबधिर लोकांवर लाठीचार्ज करण्यासाठी जनतेने भाजपला निवडून दिले नाही, अशा भावना आंदोलकांनी यावेळी व्यक्त केल्या. तसेच लाठीचार्ज करण्याचा आदेश देणा-यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

”कर्णबधीर, मूकबधिर आंदोलकांवर लाठीचार्ज करणा-या पुणे पोलिसांचा धिक्कार असो”, ”भाजप सरकारचा धिक्कार असो”, ” कर्णबधिरांवर लाठीचार्ज करणा-या फडणवीस सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय” असा जोरदार घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.