Pimpri: मास्क, साबण खरेदीत गैरव्यवहार सिद्ध; भांडार विभागाचे प्रमुख मंगेश चितळे यांना निलंबित करा- मारुती भापकर

Prove abuse in the purchase of masks, soap; Suspend Mangesh Chitale, head of stock department - Maruti Bhapkar :गैरव्यवहारात सामील असणारे लोक कोरोना विषाणू पेक्षाही भयंकर आहेत.

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्यावतीने झोपडपट्टीधारकांना पुरविलेले मास्क निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, साबण खरेदीत पुरवठादाराला पाच लाख जास्त दिल्याचे चौकशी समितीच्या अहवालात म्हटले आहे. या गैरव्यवहारात सामील असणारे भांडार विभागाचे प्रमुख मंगेश चितळे यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. या प्रकरणातील सर्व दोषी ठेकेदार पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक यांच्यावर फौजदारी कारवाई करुन या गैरव्यवहाराच्या रक्कमा संबंधिताच्या पगारातून वसूल कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

याबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाठविलेल्या निवेदनात भापकर यांनी म्हटले आहे की, पालिकेने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टीवासीयांसाठी सुमारे दिड कोटी रक्कमेचे मास्क वाटप करण्यासाठी कोणतीही निविदा न मागवता करारनामा न करता थेट पद्धतीने मास्क खरेदी केले. हा एक मास्क प्रति दहा रुपये याप्रमाणे खरेदी केला गेला.

या खरेदी बाबत मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाले. यावर आपण तीन सदस्यीय चौकशी समिती बसवली. या चौकशी समितीच्या अहवालात गंभीर बाबी समोर आल्या आहेत. अनेक संस्थाच्या मास्कला आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांची मान्यता घेतली नाही.

साई एंटरप्राइजेसने पुरवलेला मास्कचा तिसरा नमुना आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रमाणीत केला नाही. तर गुरुनूर एंटरप्राइजेस यांनी अस्तरा शिवाय मास्क पुरवले असून पिंपळेगुरव येथील कुलस्वामिनी महिला बचत गटाने पुरवलेल्या मास्कच्या नमुन्यातील कापड व रंगसंगती वेगळी असली तरी मूळ नमुन्याशी मिळतीजुळती आहे.

तर, दिगंबर महिला बचत गट, आरंभ महिला बचत गट, आनंद एंटरप्राइजेस व महावीर कार्पोरेशन यांच्याकडील आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले नमुने उपलब्ध आहेत.

तथापि त्यांनी पुरवठा केलेल्या नमुन्यांची पडताळणी करण्यासाठी भांडार विभागाने त्याचे नमुने दिले नसल्याची धक्कादायक माहिती या समितीच्या अहवालातून समोर आले आहे.

या समितीच्या अहवालावरून भांडार विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे. यामध्ये निकृष्ट, कमी दर्जाचे मास्क दिले गेले आहेत. मास्क वापरण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्याचा प्रमाणित केल्याचा दाखला नाही.

_MPC_DIR_MPU_II

हिरव्या रंगाचे मास्क मूळ नमुनाशी मिळतेजुळते नाहीत. हे मास्क कुठल्या चार पुरवठादारांनी पुरवले याची भांडार विभागाच्यावतीने समितीला माहिती देण्यात आलेली नाही.

यावरून भांडार विभाग व त्यातील अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, नगरसेवक व ठेकेदार यांनी हा संगनमताने गैरवापर केला आहे हे स्पष्ट होते.

तसेच झोपडपट्टी धारकांसाठी लाईफ बॉय साबण खरेदी करण्यात आले. त्यात 125 ग्रॅम वजनाचे 1,60, 000 लाईफबॉय साबण पुरवण्याचा दावा करण्यात आला.

जिंदल ट्रेडिंग कंपनीकडून तीन वेळा वेगवेगळ्या दराने साबण खरेदी केली. यामुळे 4 लाख 88 हजार 674 रुपये पुरवठादाराला अतिरिक्त अदा झाले आहेत असे समितीने आपल्या निष्कर्षात म्हटले आहे.

त्यामुळे या तीन सदस्य समितीच्या अहवालानुसार भांडार विभाग प्रमुख मंगेश चितळे या गैरप्रकाराला जबाबदार आहेत. या गैरव्यवहारात सामील असणारे लोक हे कोरोना विषाणू पेक्षाही भयंकर आहेत.

यामध्ये चितळे यांच्यासह सामील असणारे अधिकारी- पदाधिकारी, नगरसेवक, ठेकेदार यांच्यावर फौजदारी कारवाई करावी. यातील यातील दोषींच्या पगारातून या रकमा वसूल कराव्यात अशी मागणी भापकर यांनी निवेदनातून केली आहे.

याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी भांडार विभागाचे प्रमुख मंगेश चितळे यांच्याशी संपर्क साधला असता ‘पत्र मला अद्याप मिळाले नाही. त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देवू शकत नाही’, असे सांगत अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.