Pimpri : सर्व नागरिकांना विनाशर्त सरसकट रेशन द्या -मानव कांबळे

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड परिसरात सुमारे 25 लाख नागरिक वास्तव्यास असून, लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग, व्यवसाय व सेवा मागील एक महिन्यापासून बंद आहेत. शहरात 7 ते 8 हजार लघुउद्योग असून त्यांमध्ये जवळपास एक लाख कामगार काम करत आहेत. तसेच हॉकर्स, घरकाम करणार्या महिला, व्यापारी संस्था, दुकाने, मॉल्समधील कामगार, बांधकाम कामगार, रिक्षाचालक असे सुमारे पाच लाख मजूर बेरोजगार आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने शहरातील सर्व नागरिकांना सरसकट रेशन द्यावे, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी महापौर उषा ढोरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

शहरात इतर राज्यांतील स्थलांतरित कामगार आहेत. यापैकी बहुतेक लोक हे झोपडपट्टी मध्ये अथवा भाड्याने राहत आहेत. रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच अधिक लोकांकडे रेशनकार्ड नसल्यामुळे त्यांना अन्नधान्य मिळण्याची कुठलीही व्यवस्था नाही.

मागील अनेक वर्षांपासून बहुतांश नागरिकांनी रेशनकार्डवरील धान्य घेतले नसल्यामुळे त्यांची रेशनकार्ड बंद झाली आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने जाहीर केलेले मोफत धान्य अजूनपर्यंत तरी कुणालाही मिळालेले नाही. त्यामुळे रेशनकार्ड, आधारकार्ड किंवा इतर कुठल्याही अटी शर्ती न लावता परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत पुरेल इतके जीवनावश्यक अन्नधान्य महापलिकेच्या वतीने पुरविण्यात यावे अशी मागणी कांबळे यांनी केले आहे.

मानव कांबळे पुढे म्हणाले, यासाठी रेशनिंग वाटप यंत्रणेवर अवलंबून न राहता राज्य शासनाचे कर्मचारी, महापालिका कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, स्वेच्छेने काम करणारे सामाजिक कार्यकर्ते यांची मदत घेण्यात यावी. महापालिकेच्या प्रत्येक विभागांतील शाळांमध्ये व इमारतीमध्ये त्या-त्या विभागातील नागरिकांना त्याचा पुरवठा करणे शक्य आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे नागरवस्ती विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन योजना, मागासवर्गीय कल्याण निधी व इतर अनेक कारणांसाठी राखून ठेवलेला निधी उपलब्ध आहे. त्यामधून हे काम करता येऊ शकेल, असे त्यांचे मत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.