Pimpri : नोंदीत बांधकाम कामगारांना 15 हजारांची आर्थिक मदत करा -मिलिंद सोनवणे

एमपीसीन्यूज – सध्या कोरोना विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हाताला काम नसल्याने बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे नोंदीत सक्रिय बांधकाम मजुरांना सरकारने 2 हजार रुपयांची मदत जाहीर केली. मात्र, ही रक्कम अतिशय तुटपुंजी असून बांधकाम मजुराला सरसकट 15 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी जय महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद सोनावणे यांनी केली आहे.

याबाबत सोनवणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना ई-मेल द्वारे निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे (बीओसीडब्लू) 9.5 हजार कोटी रुपये पडून आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे बांधकाम मजुरांचे काम बंद आहे. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. अशा परिस्थितीत नोंदीत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 15000 रुपये देण्यात यावेत. जेणे करून त्यांची व त्यांच्या कुटुंबाची उपासमार होणार नाही.

काही बांधकाम मजूर बांधकाम साईटवर राहतात, त्यांना 2 वेळेचे जेवण पुरविण्यात यावे. लॉकडाउनमुळे शहरात अडकून पडलेल्या बांधकाम मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करावी.

झोपडपट्टीत राहणाऱ्या नोंदीत बांधकाम कामगारांना रेशन पूरवावे, आदी मागण्या संघटनेच्यावतीने करण्यात आल्या असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष युवराज शिंदे, सचिव प्रवीण कांबळे आणि पिंपरी विधानसभा अध्यक्ष महेंद्र निशिगंध यांनी दिली.

नोंदणीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारावेत
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकरी मंडळाने विविध कल्याणकारी योजनांसाठी ऑनलाईन सुविधा चालू केल्या आहेत. मात्र, नोंदणीसाठी अर्ज जमा होऊन दोन ते तीन महिने झाले तरी संबंधित अधिकारी नोंदणीसाठी विलंब करीत आहेत. त्यामुळे अनेक बांधकाम कामगारांना योजनांचे लाभ घेता येत नाहीत. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात यावेत.

ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीमध्ये शॉप इन्स्पेक्टर व सरकारी अधिकारी यांच्याकडून फॉर्म तपासून घेऊन विविध योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना मिळवून द्यावा. लॉकडाउनमुळे शासकीय कर्मचारी काम घरी बसून ऑनलाईन पद्धतीने काम करू शकतात, याकडे निवेदनात मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.