Pimpri: अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचा-यांना प्रोत्साहन भत्ता द्या – संदीप वाघेरे  

एमपीसी न्यूज – कोरोनाविरोधात लढणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे वेतनातील होणारी कपात रद्द करावी. पूर्ण वेतन द्यावे आणि त्यांना प्रोत्साहन भत्ताही देण्यात यावा, अशी मागणी भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी ई-मेलद्वारे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.

निवेदनात वाघेरे यांनी म्हटले आहे की, संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातलेला असून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सुध्दा त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. राज्य शासनामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महापालिकेमार्फत देखील विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. त्याकरिता अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेवून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झटत आहेत.

असे असतांना राज्य सरकारमार्फत मार्च 2020 चे शासकीय कर्मचार्‍यांचे वेतनामध्ये कपात करण्याचा घेण्यात आलेला निर्णय महापालिका कर्मचार्‍यांना लागू करतेवेळी त्यामधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना वगळून लागू करणे आवश्यक होते. तथापि,  मार्च 2020 चे वेतनामधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांचे वेतनामध्ये देखील कपात करण्यात आलेली आहे.

अशा परिस्थितीत दिवसरात्र जीव धोक्यात घालून काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे देखील वेतनामध्ये कपात करण्याचा निर्णय हा वेदनादायी असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांचे मनोधैर्य खच्चीकरण करणारा आहे. त्यांच्या वेतनामध्ये होणारी कपात ही निश्वितच अन्यायकारक आहे. याउलट देशातील काही राज्यांनी अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना जोखमीचे काम करित  असल्याने वेतानाव्यतिरिक्त प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी/कर्मचार्‍यांना वेतन कपातीसंदर्भात घेतलेल्या निर्णयामधून वगळण्यात यावे. त्यांना विषेश प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. जेणेकरून सदर कर्मचार्‍यांना कोरोना विरुध्द लढण्यासाठी अतिरिक्त पाठबळ मिळेल. तसेच मार्च 2020 चे वेतनामधून कपात करण्यात आलेली रक्कम त्वरित अदा करण्याची कार्यवाही करावी, अशी विनंती वाघेरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.