Pimpri: शहरातील नागरिकांना मूळगावी जाण्यासाठी ‘PMPML’च्या भाडे तत्त्वावरील बसेस उपलब्ध करून द्या – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज –  कोरोनाच्या संकटामुळे पीएमपीएमएलच्या ताफ्यातील भाडे तत्त्वावरील ठेकेदारांच्या बस बंद ठेवण्यात आले आहेत. परंतु, या बस भाडे तत्त्वावर घेताना करण्यात आलेल्या करारानुसार बस मार्गावर धावत नसल्या तरीही ठरलेली रक्कम संबंधित ठेकेदारांना देणे बंधनकारक आहे. त्यामुळे भाडे तत्त्वावरील बस बंद असूनही ठेकेदारांना कोट्यवधी रुपये मोजावेच लागणार आहेत. अशा स्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये कामानिमित्त राहत असलेल्या बाहेरच्या जिल्ह्यातील नागरिकांना आपापल्या मूळगावी जाण्यासाठी पीएमपीएमएलच्या भाडे तत्त्वावरील बस उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.

याबाबत आमदार जगताप यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री  तथा  पुण्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र ई-मेल केले आहे.  या पत्रात म्हटले आहे, “पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएल ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणारी संस्था आहे.

पीएमपीएमएलला पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांकडून दरवर्षी अर्थपुरवठा होतो. पीएमपीएमएलकडे आजमितीला दोन हजारहून अधिक बस आहेत. यातील बहुतांश बस या ठेकेदारांकडून भाडे तत्त्वावर घेण्यात आलेले आहेत. त्यासाठी या ठेकेदारांसोबत पीएमपीएमएलने करार केलेला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता पीएमपीएमएलच्या सर्व बस बंद ठेवण्यात आल्या आहेत.

परंतु, खासगी बस भाडे तत्त्वावर घेताना संबंधित ठेकेदारांसोबत करण्यात आलेल्या करारनाम्यानुसार बस बंद असल्या तरी ठेकेदारांना ठराविक रक्कम देणे पीएमपीएमएलवर बंधनकारक आहे. ही बाब सरकारने लक्षात घेण्याची गरज आहे.

बंद ठेवलेल्या बसेससाठी पैसे मोजण्याऐवजी या बसेसचा योग्य वापर झाल्यास त्याचा नागरिकांना फायदा होईल. ही बाब लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवडमध्ये कामानिमित्त राहत असलेल्या आणि आपापल्या मूळगावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांसाठी पीएमपीएमएलच्या भाडे तत्त्वावरील बसेसचा उपयोग करणे सहज शक्य आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये बाहेरच्या जिल्ह्यातील हजारो नागरिक राहत आहेत. यातील अनेकांना आपापल्या मूळगावी परतायचे आहे. परंतु, जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे हे नागरिक शहरात अडकून पडले आहेत.

या नागरिकांना मूळगावी जाणे सोयीचे व्हावे यासाठी पीएमपीएमएलच्या भाडे तत्त्वावरील बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था सरकारने करावी. तसे आदेश तत्काळ संबंधित यंत्रणांना देण्याची कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like