Pimpri: सातव्या वेतन आयोगासाठी 160 कोटी रुपयांची तरतूद!

वेतन निश्चितीचे काम अंतिम टप्प्यात, लवकरच कर्मचा-यांना सातव्या आयोगानुसार वेतन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2020-21 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगासाठी 160 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कर्मचा-यांना सातवा वेतन आयोगानुसार महापालिकेतर्फे वेतन निश्चित केले जात आहे. वेतन निश्चितीचे काम अंतिम टप्प्यात असून कर्मचा-यांना लवकरच सातव्या आयोगानुसार पगार मिळणार आहे.

राज्यातील शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने महापालिकेतील सातव्या वेतन आयोगाचा रखडलेला प्रश्न मार्गी लावला आहे. महापालिका कर्मचा-यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी देण्यास 21 डिसेंबर 2019 रोजी मान्यता दिली आहे. यामुळे महापालिकेतील 7 हजार 955 कर्मचा-यांसह शिक्षण समितीतील 1 हजार 47 कर्मचा-यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे.

सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने होणार आहे. महापालिकेचा आस्थापना खर्च दरमहा आठ कोटींनी तर वार्षिक 96 कोटींनी वाढणार आहे. ‘अ’ वर्ग कर्मचा-यांचे वेतन हे 23 हजांरानी तर वर्ग दोनचे वेतन 21 हजार रूपयांनी, वर्ग तीनचे वेतन 17 हजार रूपयांनी आणि वर्ग चारच्या कर्मचा-यांचे वेतन 10 हजार रूपयांनी वाढेल.

महापालिकेने अर्थसंकल्पात 160 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरु केली आहे. वेतनवाढ निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. निश्चितीचे काम पुर्ण झाल्यानंतर सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचा-यांना पगार मिळणार असून वेतनाचा फरक चार टप्प्यात दिला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.