Pimpri: कामगारांविरोधी सरकारला सत्तेतून खाली खेचा – डॉ. जी. संजिवा रेड्डी 

एमपीसी न्यूज – कामगारांचे आर्थिक, सामाजिक शोषण करीत भांडवलदारांना सरकार मदत करीत आहे. कामगारांविरोधी धोरण राबविणा-या  सरकारला आगामी निवडणूकीत सत्तेतून घालविले पाहिजे. त्यासाठी देशभरातील कोट्यावधी कामगारांनी 8 व 9 जानेवारी 2019 ला पुकारण्यात आलेल्या अखिल भारतीय संपात सहभागी व्हावे, असे आवाहन कामगार संघटना कृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार डॉ. जी. संजिवा रेड्डी यांनी केले.

कंत्राटीकरण, जनविरोधी खाजगीकरण रद्द करण्यासाठी, सार्वत्रिक सामाजिक सुरक्षेच्या हक्कासाठी देशभरातील कामगारांचा सर्व संघटनांच्या वतीने 8 व 9 जानेवारी 2019 ला अखिल भारतीय संप पुकारण्यात आला आहे. त्याची घोषणा डॉ. जी. संजिवा रेड्डी यांनी आज (सोमवारी) पिंपरी केली.  यावेळी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम, ज्येष्ठ कामगार नेते ऍड. म.वि.अकोलकर, अजित अभ्यंकर, दिलीप पवार, मनोहर गाडेकर, अनिल आवटी, शशिकांत धुमाळ, वसंत पवार, अनिल रोहम, यशवंत सुपेकर, भारती घाग उपस्थित होते.

रेड्डी म्हणाले, केंद्र सरकार सार्वजनिक बँका, रेल्वे, विमा, पोस्ट, आरोग्य, शिक्षण, औद्योगिक, सार्वजनिक आस्थापना, केंद्र व राज्य सरकारच्या आस्थापना, सरकारी व निम सरकारी महामंडळे यांसह संरक्षण क्षेत्रात देखील खासगीकरण व कंत्राटीकरण करीत आहे. हे खासगीकरण जनविरोधी व सर्व समाजाची सामाजिक सुरक्षा धोक्यात आणणारे आहे. यामुळे देशभरातील कोट्यावधी कामगार व त्यांची कुंटूंबियांचे आर्थिक, सामाजिक शोषण सरकार बरोबरच भांडवलदार वर्ग करीत आहे. अनेक राज्यात किमान वेतनामध्ये दहा ते पंधरा वर्ष वाढ केली जात नाही. त्यामुळे कामगारांचा आर्थिक स्थर आणि सामाजिक सुरक्षा धोक्यात येते.

संपात या संघटना होणार सहभागी!
या संपात इंटक, आयटक, सिटू, एचएमएस, टीयुसीसी, एआययुटीयूसी, एआयसीसीटीयू, सेवा, युटीयूसी, एलपीएफ, राष्ट्रवादी कामगार सेल, श्रमिक एकता महासंघ, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघ, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन, बँक, विमा, संरक्षण, पोस्ट, बीएसएनएल, केंद्र सरकारी कर्मचारी, वीज मंडळ, राज्य सरकारी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी (नर्सेस व इतर), अंगणवाडी, आशा, अंगमेहनती कष्टकरी, हमाल, बाजार समिती, वाहतूक, परिवहन, रिक्षा, पथारी, फेरीवाले, बांधकाम, घर कामगार क्षेत्रातील संघटीत, असंघटीत सर्व कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.