Pimpri: ‘एचए’च्या जागेत पुण्यातील ‘पीएफ’ कार्यालय स्थलांतरित होणार!

पीएफच्या एक्झेक्युटीव्ह कमिटीचा मान्यता; कामगारांना मिळणार दिलासा

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील हिंदुस्थान अँण्टीबायोटिक्स (एचए) कंपनीच्या जागेत पुण्यातील गोळीबार मैदान येथील ‘पीएफ’चे विभागीय कार्यालय स्थलांतरित होणार आहे. याशिवाय पुणे क्षेत्रिय आणि आकुर्डीतील क्षेत्रिय कार्यालयांचे देखील पिंपरीत स्थलांतर होणार आहे. एचए कंपनीच्या प्लॉट नंबर पी 6 या साडेतीन एकर जागेत हे पीएफ कार्यालय होणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला पीएफ एक्झेक्युटीव्ह समितीने मान्यता दिली. पीएफ कार्यालय शहरात होणार असल्याने कामगारांना दिलासा मिळणार आहे.

भविष्य निर्वाह निधी (पीएफ) कार्यालयाचे विभागीय कार्यालय आणि पुणे विभागाचे क्षेत्रिय कार्यालय पुणे-सोलापूर रस्त्यावरील गोळीबार मैदान येथे आहे. पुणे कॅन्टोंमेट बोर्डाच्या जागेत हे कार्यालय आहे. तर, आकुर्डीत क्षेत्रीय कार्यालय आहे. सात ते आठ लाख रुपये भाडेतत्वार ही कार्यालये सुरु आहेत.

  • या कार्यालयामध्ये दररोज नागरिकांची मोठ्या संख्येने ये-जा असते. नागरिकांची ये-जा लक्षात घेता विभागीय कार्यालयाकडून स्वत:च्या मालकीच्या जागेसाठी प्रयत्न सुरु केले जात होते. त्यासाठी लेबर मिनिस्ट्री अंतर्गत कार्यरत पीएफ एक्झेक्युटीव्ह कमिटीकडे मागणी केली होती. त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात जागेचा शोध सुरु होता.

पिंपरीतील एच.ए. कंपनीने त्यांची साडेतीन एकर जागा देण्यास सहमती दर्शविली. त्यानुसार केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त सुनील बरतवाल यांनी एच.ए. कंपनीच्या जागेची पाहणी केली होती. 20 मे रोजी पीएफ एक्झेक्युटिव्ह कमिटीची दिल्ली येथे बैठक झाली. त्या बैठकीत एच.ए.कंपनीच्या साडेतीन एकर जागेवर कार्यालय करण्यास मंजुरी देण्यात आली अशी माहिती पुणे विभागाचे क्षेत्रिय आयुक्त अतुल कोतकर यांनी दिली. सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट (सीपीडब्लूडी) ठरवून देईल. त्याप्रमाणे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने जागा खरेदी करण्यास सहमती दर्शविली आहे.

  • 1991 पासून पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या जागेत पुणे विभागाचे तर आकुर्डी गावठाणात सन 2008-09 दरम्यान आकुर्डी क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज कार्यान्वित आहेत. दोन्ही क्षेत्रिय कार्यालये मिळून चारशे कर्मचारी कार्यरत आहेत. नागरिक आणि कर्मचारी दोघांच्या दृष्टीने पीएफचे कामकाज अधिक गतीमान व्हावे. याकरिता एकाच जागेत पीएफची कार्यालये असावीत. यासाठी पीएफच्या महाराष्ट्र झोनल ऑफीसचे अॅडिशनल कमिशनर सत्यनारायण यांनी विशेष प्रयत्न केले.

याबाबत बोलताना पुणे विभागाचे क्षेत्रिय आयुक्त अतुल कोतकर म्हणाले, पुणे आणि आकुर्डीतील अपुरी जागा, नागरिकांची वाहने पार्क करण्याची अपूरी व्यवस्था याचा विचार केल्यानंतर पीएफ कार्यालयाचे स्वत:च्या मालकीचे कार्यालय असावे. असा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे एच.ए. कंपनीच्या पीएफच्या कामकाजासाठी मोठी इमारत बांधण्यात येईल. जागेत कर्मचा-यांसाठी निवासाची सोय, वाहनांसाठी पार्किंगची सुविधा केली जाईल. दोन वर्षात काम पूर्ण करण्याचे उदिष्ट देण्यात आले आहे. या जागेवर एकत्रितपणे कामकाज करणे सुलभ होईल. नागरिकांची गैरसोयसुद्धा होणार नाही. जागा ताब्यात आल्यानंतर बांधकामासंबंधीचे नियोजन केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.