Pimpri : पुणे मेट्रो पोहचली रुळापर्यंत; साडेचार किलोमीटरचा मार्ग तयार

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोचा साडेचार किलोमीटरचा उन्नत मार्ग तयार झाला आहे. त्या मार्गावर टाकण्यासाठी रूळ देखील आणण्यात आले आहेत. पुणे मेट्रो रुळापर्यंत पोहोचली असून त्यानंतर ओव्हरहेड वायर आणि इलेक्ट्रिकचे काम करून रेल्वेची ट्रायल घेण्यात येणार आहे. ही ट्रायल येत्या डिसेंबरपर्यंत घेण्याचा महामेट्रोच मानस आहे.

नागपूरहून 600 मेट्रिक टन रूळ पुणे मेट्रोसाठी आणण्यात आले आहेत. या रुळामुळे पुणे मेट्रोचे सुमारे पाच किलोमीटर अंतरावर रूळ टाकण्यात येणार आहेत. पुण्यात आलेल्या मेट्रो रुळांचे शुक्रवारी (दि. 14) महामेट्रोच्या वरिष्ठ अधिका-यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

  • पुणे मेट्रोसाठी 18 मीटर लांबीचे रेल्वे रूळ वापरण्यात येणार आहेत. हे रेल्वे रूळ अत्याधुनिक फ्लॅश बट व अॅल्युमिनियम थर्मिट वेल्डिंग तंत्रज्ञानाद्वारे एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. जोडलेल्या रेल्वे रुळांचे अत्याधुनिक अल्ट्रा सॉनिक मशीनद्वारे टेस्टिंग केले जाणार आहे. तयार झालेल्या उन्नत मार्गावर ट्रॅक बेड तयार करून त्यावर रूळ बसवण्यात येतील. रूळ बसवण्याचे काम आज (शुक्रवार,दि. 14) पासून सुरु झाले आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी एकूण 9 हजार मेट्रिक टन रुळांची आवश्यकता आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ते रेंजहिल या मार्गासाठी तीन हजार मेट्रिक टन रुळांची आवश्यकता आहे. त्यातील 600 मेट्रिक टन नागपूरहून मागवण्यात आले आहेत. हे रूळ स्वित्झर्लंडच्या कंपनीने त्यांच्या सायबेरियातील कारखान्यात बनविले आहेत.

  • प्रत्येक महिन्याला एक किलोमीटर या गतीने रूळ टाकण्याचे काम होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका ते रेंजहिल या मार्गावर येत्या डिसेंबरपर्यंत रूळ टाकून पूर्ण होणार असल्याची खात्री महामेट्रोकडून व्यक्त करण्यात येत आहे.

खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या जागेत मेट्रोचे काम अजूनही सुरु झाले नाही. महामेट्रोकडून खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून मेट्रोचे काम करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे. काम सुरु होणार आहे, अशी माहिती देण्यात येते. मात्र अद्यापपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.

  • येत्या डिसेंबरपर्यंत रूळ अंथरून ओव्हरहेड वायरिंगचे काम करून मेट्रोची ट्रायल घेण्याचा मानस जरी महामेट्रोने केला असला तरी परवानगी आणि अन्य केंद्रीय पातळींवरील प्रशासकीय सोपस्कारांअभावी खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत मात्र, महामेट्रोला ‘थांबा’च घ्यावा लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.