Pimpri : मेट्रोची ट्रायल रन यशस्वी

एमपीसी न्यूज – पुणे महामेट्रोची पिंपरीतील संत तुकारामनगर ते खराळवाडी दरम्यानच्या दीड किमीच्या टप्प्यात ही चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली आहे. यापुढील काळातही मेट्रोच्या आणखी चाचण्या घेण्यात येणार असून, मेट्रो सुरक्षा आयुक्तांसह (सीएमआरएस) इतर प्राधिकरणांकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आल्याचे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) स्पष्ट केले.

महामेट्रोने पिंपरीतील प्राधान्य मार्गावर बहुतांश कामे काही दिवसांपूर्वीच पूर्ण केली होती. वर्षअखेरीस दोन ट्रेन पिंपरीत दाखल झाल्या. मेट्रो धावण्यासाठी वीजवाहक तारा प्रवाहित करण्यात आल्याने शुक्रवारी सायंकाळी दीड किमीच्या मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली.

नागरिकांसाठी मेट्रो खुली करण्यापूर्वी विविध प्राधिकरणांकडून त्याचे सुरक्षा प्रमाणपत्र महामेट्रोला घ्यावे लागणार आहे. त्यासाठी सीएमआरएस, रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्डायझेशन ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) आणि रेल्वे बोर्ड यांच्याकडे सुरक्षा तपासणीसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत या तिन्ही प्राधिकरणांचे अधिकारी प्रत्यक्ष संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन आणि परिसराला भेट देऊन पाहणी करतील. त्यांच्याकडून प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर मेट्रोतून प्रवास करणे नागरिकांना शक्य होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.