Pimpri: निगडीपर्यंत मेट्रोचा ‘डीपीआर’ महापालिकेकडे सादर; पंधराशे कोटी खर्च अपेक्षित

एमपीसी न्यूज – पिंपरी ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंतच्या पुणे महामेट्रोच्या वाढीव सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) अहवाल महामेट्रोने गेल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सादर केला आहे. त्या अहवालाचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. तसेच सात किलोमीटर मार्गासाठी अंदाजे पंधराशे कोटी रुपये अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात स्वारगेट ते पिंपरी या मार्गावर पुणे मेट्रोच्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामासोबत पहिल्या टप्प्यात पिंपरी ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत मेट्रो नेण्याची आग्रही मागणी शहरवासियांकडून केली जात होती. त्यानंतर महापालिकेने महामेट्रोला पिंपरी ते निगडीपर्यंत डीपीआर तयार करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार महामेट्रोकडून डीपीआरचा अहवाल तयार केला आहे. गेल्या आठवड्यात तो अहवाल महापालिकेकडे सुपूर्द केला आहे. या संदर्भात माहिती देताना आयुक्त हर्डीकर म्हणाले की, पिंपरीपर्यंत महामेट्रोचे काम सुरु आहे. पिंपरीच्या पुढे निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत मेट्रो नेण्यात येणार आहे. हे अंतर सुमारे 7 किलोमीटर असून, त्या प्रकल्पासाठी एकूण 1 हजार 500 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 200 कोटींचा खर्च पालिकेस करावा लागणार आहे. तर, अर्धा खर्च केंद्र व राज्य शासन पेलणार आहे. उर्वरित खर्च महामेट्रो विविध माध्यमातून उभा करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.