Pimpri : सर्वंकष वाहतुक विकास आऱाखड्याचे नियोजन लवकरच सादर – किरण गित्ते

एमपीसी न्यूज – पुण्यातील सध्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या बनलेल्या वाहतूक प्रश्‍नावर मार्ग काढण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सुमारे सात हजार 200 चौरस किलोमीटर लांबीच्या क्षेत्रफळाचा ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ (सीएमपी) तयार करण्याचे नियोजन केले. त्याची माहिती येत्या 27 नोव्हेंबरला सादर करणार असल्याची माहिती पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी आज (दि .23) दिली.

पिंपरीतील नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात आयोजित ”पिंपरी-चिंचवडच्या विकासात पीएमआरडीचे योगदान” याविषयावर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम पीएमआरडीएने ‘एल अॅण्ड टी’ या कंपनीला निविदा मागवून दिले होते. या कंपनीकडून त्यापैकी पहिल्या टप्प्यात दोन हजार चौरस किलोमीटरच्या परिसरातील वाहतुकीचा अभ्यास करून पीएमआरडीएला आराखडा सादर केला आहे. त्यामध्ये वरील प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. हा आराखडा तयार करताना रेल्वे प्रशासन आणि एसटी महामंडळ यांचा देखील अभिप्राय घेण्यात आला असून भविष्यातील त्यांची गरज लक्षात घेऊन, अनेक नवीन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीपासून सुमारे 10 किलोमीटरच्या परिसरातील वाहतुकीचे नियोजन यामध्ये करण्यात आले आहे.यामध्ये मेट्रो, मोनो रेल, लाइट रेल, बायपास रेल आणि बीआरटी या मोठ्या प्रकल्पांसह प्रमुख चौकांचे रुंदीकरण असा सुमारे 66 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची माहिती देण्यात येणार आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यातील हडपसर, खराडी, उरूळी कांचन, रांजणगाव गणपती, सणसवाडी, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, पिरंगुट, तळेगाव दाभाडे, चाकण तसेच जेजुरी आदी विविध भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक आणि आयटी पार्क उदयास आले आहे. या परिसराचा वेगाने विकास होत असून, औद्योगिक तसेच निवासी क्षेत्र याठिकाणी वाढले आहे. या कार्यक्षेत्रात जवळपास 77 लाख 50 हजार लोक राहतात. त्यांना उत्तम सुविधा निर्माण करणे पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच पीएमआरडीए या तिन्ही संस्थांपुढे मोठे आव्हान आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलीनीकरण तूर्तास अशक्‍य असल्याचे पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.

पुढील 50 वर्षांचा विचार करून एल अ‍ॅण्ड टी कंपनीला सार्वजनिक सर्वकष वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम दिले होते. सन 2038 पर्यंत मेट्रोचे दोन टप्प्यातील मार्ग पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जानेवारी 2019 मध्ये पीएमआरडीच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. राज्याच्या महामेट्रो कंपनीच्या वतीने कात्रज ते निगडी आणि वारजे ते चंदननगर या मागार्चे काम सुरू झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील वाघोली ते हिंजवडी, चांदणी चौक ते हिंजवडी, खडकवासला ते पुणे कॅन्टोमेन्ट हद्द आणि हिंजवडी ते चाकण या मार्गांचे नियोजन पुढील काळात करण्यात येणार आहे, असे किरण गित्ते यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like