Pimpri: भूसंपादनाच्या विषयावरुन स्थायी समितीत राडा, सभाकामकाज रोखले

भाजप नगरसेवकच आक्रमक, अखेरीस ऐनवेळचे 63 विषय केले रद्द

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर, वाकड, सांगवी, चिखली, मोशी परिसरातील खासगी वाटाघाटीद्वारे भूसंपादनाच्या आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आयत्यावेळच्या प्रस्तावावरुन स्थायी समिती सभेत गदारोळ झाला. स्थायीचे सदस्य नसलेल्या भाजप नगरसेवकाने हा विषय मंजूर करण्याची आग्रही मागणी केली. त्याला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने साथ दिली. भूसंपादनाच्या विषयाला मान्यता देणार नसल्याची भूमिका अध्यक्षांनी घेतल्याने सभाकामकाज रोखण्यात आले. अखेरीस भूसंपादनाच्या विषयासह एकही आयत्यावेळचा विषय मंजूर करायचा नाही. या अटीवर तोडगा निघाला आणि सभा पार पडली. ऐनवेळचे 63 विषय घेतले नाहीत.

पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) आयोजित केली होती. सभेची वेळ दुपारी अडीचची होती. परंतु, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पिंपरीतील भीमसृष्टीचे उदघाटन तीन वाजता असल्याने सभा सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुढे ढकलली होती.

स्थायी समिती सभापतींच्या दालनात पिंपळे सौदागर, वाकड, सांगवी, चिखली, मोशी परिसरातील खासगी वाटाघाटीद्वारे भूसंपादनाचा आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा आयत्यावेळच्या प्रस्ताव मंजूर करण्यावरुन स्थायीच्या सदस्यांमध्ये चर्चा झाली. हा प्रस्ताव मंजूर करण्याचा आग्रह स्थायी समितीचे सदस्य नसलेले सत्ताधारी भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी धरला होता.

त्यांना शिवसेना गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे मयुर कलाटे, पंकज भालेकर यांनी साथ दिली. परंतु, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी हा विषय मंजूर करण्यास नकार दिला. त्यामुळे नगरसेवकांमध्ये वादावादी सुरु झाली. सभा होऊ देणार नसल्याचा पवित्रा या सदस्यांनी घेतला. राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी आयत्यावेळच्या विषयांचे दप्तर स्वत:च्या ताब्यात घेतले.

पावणेसहा वाजता अध्यक्ष मडिगेरी स्थायी समितीच्या सभागृहात केले. त्यावेळी केवळ चार सदस्य सभागृहात उपस्थित होते. कोरम पूर्ण होत नसल्याने सभाकामज सुरु करता आले नाही. भूसंपादनाचा प्रस्ताव मंजूर करायचा अन्यथा एकही आयत्यावेळचा विषय मंजूर करायचा नाही, अशी भूमिका घेत राहुल कलाटे, मयूर कलाटे, शत्रुघ्न काटे, पंकज भालेकर यांनी स्थायी सभागृहाच्या दारासमोर आंदोलन सुरु केले. ‘नही चलेगी, नही चलेगी दादागिरी नही चलेगी अशा घोषणाही दिल्या’. स्थायीच्या इतर सदस्यांनी या तिघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी माघार घेतली नाही.

अखेरीस स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी आयत्यावेळचा एकही विषय मंजूर करणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर सभेला सुरुवात झाली. सभा सुरु होताच ‘कोणाचा फोन आल्यावर पुन्हा आयत्यावेळचे’ विषय मंजूर करायचे नाहीत, असे कलाटे म्हणाले. त्यानंतर मडिगेरी यांनी आपले दोन्ही फोन त्यांच्याकडे देऊ केले. परंतु, त्यांनी ते घेतले नाहीत. त्यानंतर सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. त्यानंतर पाच मिनिटांत विषयपत्रिकेवरील 34 कोटी 64 लाख रुपयांच्या खर्चाच्या 80 विषयांना मान्यता देण्यात आली.

भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांच्यावर आरोप केले. त्याला मडिगेरी यांनी देखील प्रत्युत्तर दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.