Pimpri : लाडशाखीय वाणी समाजाची उद्योग-व्यवसायात कौतुकास्पद भरारी – राधाकृष्ण विखे

एमपीसी न्यूज – छोटे-छोटे व्यवसाय करत रिअल इस्टेटच्या व्यवसायापासून तर कारखाने, आयटी उद्योगापर्यंत लाडशाखीय वाणी समाजाने ठसा उमटवला आहे. समाजाची आतापर्यंतची वाटचाल अभिमानास्पद आहे. समाजाचा विकास व्हावा या उदात्त हेतून अधिवेशन होत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्‍त केले.
लाडशाखीय वाणी समाजाच्या वतीने पुणे (मारुंजी) येथे शनिवारी (दि. 24) दोन दिवसीय अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाचे महाअधिवेशनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या अधिवेशनाच्या पहिल्‍या दिवसाच्या सत्राचा समारोप विखे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खा. राजू शेट्‍टी, अधिवेशनाचे कार्याध्यक्ष कैलास वाणी, स्वागताध्यक्ष आर.एन.वाणी तसेच अनिल चितोडकर, निलेश पुरकर, राजेश कोठवडे, श्यामकांत शेंडे, राजेंद्र मालपुरे, विलास शिरोडे, कल्‍पेश भुसे, राजेंद्र पाचपुते आदींसह राज्यभरातून आलेले 40 हजारांहून जास्त समाज बंधू-भगिनी उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. जगदीश चिंचोरे, व्हा. ॲडमिरल सुनिल भोकरे, जयंत वाणी (ओएसडी, मंत्रालय), सुनील भामरे यांचा विशेष उल्‍लेखनिय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.

विखे पाटील म्‍हणाले,सध्याचे सरकार आश्वासनांपलीकडे काही देऊ शकत नाही.उद्‌घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी समाजातील500 विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय व्हावी या उद्देशाने पुण्यात सरकारच्या वतीने जागा देण्यात येईल असे आश्वासन दिले.हे आश्वासन मुख्यमंत्री पूर्ण करणार का ? असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला. परंतु, वाणी समाजाला जागा मिळण्यासाठी आम्ही विरोधीपक्ष म्‍हणून पाठपूरावा करु. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. तरुणाईने तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या खुबीने केला आहे. या टेक्‍नोसॅव्ही पिढीकडे ज्येष्ठांनी व्यवसायाची जबाबदारी सोपवावी.केवळ पारंपरिक व्यवसायालाच महत्त्व न देता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये नवीन व्यवसायाच्या संधी उपलब्‍ध होत आहेत. त्यासाठी युवा पिढीला प्रोत्साहन द्यावे असे विखे पाटील यांनी सांगितले.
प्रास्ताविकात कैलास वाणी यांनी केले.सूत्रसंचालन राहुल सोलापूरकर, समिरा गुजर यांनी केले. आभार आर.एल.वाणी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.