Pimpri: पीएमपीएमएल मधून पीसीएमटीचे तत्काळ विलगीकरण करा – महापौर जाधव

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन मंडळाकडून (पीएमपीएमएल) पिंपरी-चिंचवड शहराला सापत्नपणाची वागणूक दिली जाते. निर्णयप्रक्रियेत पदाधिका-यांना विश्वासात घेतले जात नाही. बसेस उपलब्ध करुन दिल्या जात नाहीत. त्यामुळे पीएमपीएमएल मधून पीसीएमटीचे तत्काळ विलगीकरण करण्यात यावे, अशी मागणी महापौर राहुल जाधव यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पीसीएमटी आणि पीएमटी यांचे सन 2007 मध्ये एकीकरण होऊन पीएमपीएमपीएलची स्थापना झाली. या कंपनीचा कारभार चालवण्यासाठी पुणे महापालिका 60% व पिंपरी-चिंचवड महापालिका 40 % रक्कम अदा करण्याचे ठरले. त्यानुसार सन 2007 पासून पिंपरी महापालिकेने पीएमपीएमएलला ठरल्याप्रमाणे 40 टक्के हिश्याची रक्कम नियमितपणे अदा केली आहे. तरीही, पीएमपीएम मधील कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये महापालिकेच्या पदाधिका-यांना विश्वासात घेतले जात नाही.

पूर्व पीसीएमटीच्या कर्मचा-यांना दुय्यम वागणूक दिली जाते. त्यांची सेवाज्येष्ठता डावलली जात असल्याचे दिसून येते. पीएमपीची सेवा नागरिकांना व्यवस्थितपणे मिळत नाही. शहरासाठी बसची संख्या अपुरी आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये नेहमी जुन्या प्रकारच्या बस आढळून येतात. वेळेवर बस येत नसल्याने नागरिकांना कायम त्रासाला सामोरे जावे लागते. संचालक मंडळाची बैठक ठरलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित केल्या जात नाहीत. पीएमपीएमएल कंपनीचे अधिकारी हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक, अधिकारी व पदाधिकारी यांना सन्मानपुर्वक वागणुक देत नाही. त्यांनी दिलेल्या पत्रांना उत्तरे दिली जात नाहीत.

गेल्या सहा महिन्यांपासून नियमितपणे सात ते आठ बसेस दररोज बंद पडण्याचे व बसेसना आग लागण्याचे प्रमाण वाढलेले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बस डेपोमध्ये कुशल कर्मचा-यांची कमतरता आहे. नागरिकांच्या तक्रारीचा कल लक्षात घेता पीएमपीएमएलचे विलगीकरण करुन पीसीएमटी वेगळी करण्यात यावी असे, अशी मागणी महापौर जाधव यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.