Pimpri: रिक्षा चालक ते शहराचे प्रथम नागरिक; महापौर राहुल जाधव यांचा प्रवास

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदी सत्ताधारी भाजपचे जाधववाडीचे नगरसेवक राहुल जाधव यांची आज निवड करण्यात आली. रिक्षा चालक ते शहराचे प्रथम नागरिक असा प्रेरणादायी प्रवास जाधव यांचा आहे.

राहुल जाधव मूळचे जाधववाडी-चिखलीचे रहिवाशी आहेत. 15 मार्च 1982 मध्ये त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आहे. जाधववाडीतील जीवण शिक्षण विद्या मंदिर शाळेत त्यांचे चौथी पर्यंत शिक्षण झाले. सातवीपर्यंतचे शिक्षण च-होलीगावातील वाघेश्वर विद्यालयात झाले आहे. नववीचे शिक्षण पुंरदर तालुक्यातील मावशीच्या गावी पिंपळे येथे झाले. घरची हलाखीची परस्थिती असल्यामुळे दहावी झाल्यानंतर जाधव यांनी शेती करण्यास सुरुवात केली. शेती परवडत नसल्यामुळे त्यांनी जोडधंदा म्हणून सिक्स सिटर चालविण्यास सुरुवात केली. चिखली ते पिंपरी या मार्गावर त्यांनी सिक्स सिटर चालविला. पाच ते सहा वर्ष ते रिक्षा चालवत होते. त्यानंतर काही काळ त्यांना एका कंपनीत चालक म्हणून नोकरी केली.

राज ठाकरे यांना गुरु म्हणून 2006 मध्ये जाधव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम करण्यास सुरुवात केली. मनसेच्या माध्यमातून आंदोलनात सहभाग घेतला होता. 2012 साली जाधव यांनी मनसेकडून पिंपरी महापालिकेची पहिली निवडणूक लढविली आणि ते पहिल्यांदाच मोठ्या मताधिक्याने नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 2017 मध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केला. फेब्रुवारी 2017 मध्ये त्यांनी प्रभाग क्रमांक दोन चिखली गावठाणातून भाजपच्या चिन्हावर महापालिका निवडणूक लढविली. या निवडणुकीत तीन हजार मतांच्या फरकाने ते निवडून आले आहेत.

राहुल जाधव यांच्या राजकीय प्रवासामध्ये त्यांचे आजोबा चऱ्होलीचे सावळाराम बुर्डे यांचा देखील महत्वाचा वाटा आहे. जाधव यांचा आवडता छंड बैलगाडा शर्यत असून बैलगाडा क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. जाधव यांच्या गळ्यात आता पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदाची माळ पडली आहे. रिक्षा चालक ते शहराचे प्रथम नागरिक असा त्यांचा आजवरचा प्रवास आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.