Pimpri: ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्पच भागवेल भविष्यात शहराची तहान

'रेन वॉटर हार्वेस्टिंग' प्रकल्पासाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची आवश्यकता

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – राज्याच्या अनेक भागात सध्या पाणीबाणी सुरु आहे. तर, आपल्या पिंपरी-चिंचवड शहरात एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. आगामी काही वर्षात शहरावर देखील पाण्याचे मोठे संकट कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी प्रत्येकाने पाणी जपून वापरणे आणि असलेल्या पाण्याचे नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेने पुढाकर घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पावसाचे वाहणारे पाणी जर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्पाच्या माध्यमातून साठवून ते नंतर भूगर्भात जिरवले तर पाण्याची समस्या जाणवणार नाही. ‘जल है तो कल है’ या उक्तीप्रमाणे आत्तापासूनच पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याबाबत सकारात्मक पाऊले उचलणे गरजेचे आहे.

पाण्याचा वापर वाट्टेलतसा केला जात असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. बेसुमार बांधकाम त्यासाठी होणार पाण्याचा अपरिमित वापर, मोठमोठ्या कारखान्यांमध्ये पाण्याचा होणारा अपव्यय, बेकायदेशीररित्या खणलेल्या बोअरवेल्स, मान्सूनचे घालणारे प्रमाण या आणि अश्या काही कारणांमुळे जमिनीखालील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा वाहून जाणारा थेंब न थेंब वाचवला गेला पाहिजे. इमारतींच्या गच्चीतून वाया जाणारे पावसाचे पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पाणी साठवणे किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवून पावसाचे पाणी भूजलामध्ये जिरवले गेल्यास पाण्याची पातळी वाढून उन्हाळ्यात देखील बोअरवेलचे पाणी कमी होणार नाही. मात्र सध्या पाण्याच्या फिक्स डिपॉझिट मधून फक्त पाणी काढले जात आहे, ते पुन्हा परत करण्याची भूमिका घेतली जात नाही ही दुर्दैवाची बाब आहे.

पाणीटंचाईमुळे पिंपरी-चिंचवड महापलिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये लाखो लिटर पाणी वाहून जाते. पावसाळा सुरु झाला की रस्त्यांमध्ये पाणी तुंबू लागते. नाले भरून वाहू लागतात. त्यामुळे वाहतूक ठप्प होते. रस्त्यांमध्ये वाहणारे हे पाणी जर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या मदतीने साठविले गेले तर पाण्याचे दुर्भिक्ष्य नक्कीच कमी होईल. या वाहून जाणाऱ्या पाण्यावर महापलिकेने लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प हाती घेणे आवश्यक आहे. शहरामध्ये महापालिकेच्या अनेक मिळकती आहेत. महापालिकेच्या शाळा आहेत. महापालिकेच्या प्रत्येक इमारतींवर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प राबवला तर लाखो लिटर पाण्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो. त्यातून शहराची पाण्याची तहान भागवता येऊ शकते. पावसाच्या पाण्याचा साठा करुन ते पिण्याव्यतिरिक्त अन्य उपयोगाकरिता देखील वापरता येते. शौचालय सफाई, बागेकरिता, वाहने धुण्याकरिता हे पाणी वापरता येऊ शकते.

रेन वॉटर हार्व्हेस्टिंग प्रकल्पामध्ये पावसाचे पाणी घराच्या जवळ जमिनीमधे असलेल्या टाकीमध्ये साठविले जाऊन, ते शुद्ध करून पाईप्सद्वारे पुन्हा जमिनीमध्ये जिरविले जाते. प्रत्येक सोसायटीमध्ये रेन वॉटर हार्व्हेस्टिंगची व्यवस्था असणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. पालिकेकडून बांधकामाला पूर्णत्वाचा दाखल मिळावा यासाठी बांधकाम व्यावसायिक काहीतरी थातुरमातुर प्रकल्प उभा करतात. भविष्यात त्याचा काहीही फायदा होत नाही. केवळ कायदा करून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी मोठ्या जनजागृतीची गरज आहे. अनेक सामाजिक संस्था यासाठी काम करीत आहेत.

याबाबत बोलताना भाजप नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले, ”पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचा आणि ते वापरात आणण्याचा यशस्वी प्रयोग महापलिकेने अवलंबिणे आवश्यक आहे. या प्रकल्पाचा निश्चित फायदा होईल. त्यामुळे शहरातील भूजल पातळीत वाढ होईल. त्यातून शहरातील बोअरवेल व इतर मध्यमातून नागरिकांना वापरण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. घरातील टाक्यांमध्ये देखील पावसाचे पाणी साठवता येईल. तसेच महापालिकेवरील पाण्याचा अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल. वेस्टेज पाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी टँकरद्वारे खासगी बागबगिचे किंवा इतर वापरासाठी पुरविता यईल का ? याशिवाय अग्निशमनासाठी वापरणे शक्य होईल का ? याचा शास्त्रोक्त पद्धतीने महापालिकेने विचार करण्याची गरज आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अ‍डविण्याची सुविधा विकसित करण्यासाठी, छोटे नाले, स्ट्रॉम वॉटर लाईन, सुव्यवस्थित करणे गरजेचे आहे. महापालिकेने पावसाळ्याआधी या विषयाकडे गांभीर्याने पहावे. रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पासाठी पुढाकार घ्यावा” असे संदीप वाघेरे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like