Pimpri: रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; पुन्हा कडकडीत लॉकडाऊन करा-नगरसेवकांची वाढती मागणी

Rapid increase in patient numbers; Strict lockdown again - increasing demand from corporators :रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; पुन्हा कडकडीत लॉकडाऊन करा-नगरसेवकांची वाढती मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची साखळी तोडण्याची गरज आहे. त्यासाठी पिंपरी- चिंचवडमध्ये पुन्हा एकदा कडेकोट शहर बंदचा निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांमधून करण्यात येत आहे.

माजी महापौर, नगरसेविका मंगला कदम, भाऊसाहेब भोईर, बाबू नायर, सीमा सावळे, सुलभा उबाळे यांनी पुन्हा लॉकडाउन करण्याची मागणी केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने अत्यंत चागले काम केले. त्यामुळे सुरुवातीला शहरात कोरोना नियंत्रणात राहिला होता.

राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, जळगाव, सोलापूर अशा काही शहरांतील कोरोना रुग्ण, मृतांची संख्या असा सारासार विचार केला असता पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका प्रशासनाने परिस्थिती व्यवस्थित हाताळली.

मात्र, 22 मे रोजी शहराला रेडझोनमधून वगळल्यापासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. 1 जूनपासून अनलॉक सुरु झाल्यानंतर रुग्णसंख्येतील वाढ सुरुच आहे. आठवड्यापुर्वी 150 ते 175 अशा सरासरीने रुग्णांची संख्या वाढत होती.

आता गेल्या चार दिवसांत हे प्रमाण जवळपास दुपटीने म्हणजे 300 ते 315 च्या सरासरीने पुढे चालले आहे. ही शहरासाठी धोक्याची घंटा आहे.

नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या महापालिकांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडेकोट शहर बंदचा निर्णय एकमुखाने घेतला आणि तत्काळ त्याची अंमलबजावणी सुरू केली. याच धर्तीवर पिंपरी- चिंचवडमध्येही पुन्हा एकदा कडेकोट शहर बंदचा निर्णय घेण्याची नितांत आवश्यकता आहे. नगरसेवकांमधून ही मागणी करण्यात येत आहे.

नगरसेवक म्हणतात…

मंगला कदम यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जुलै – ऑगस्टमध्ये सुध्दा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढणार आहे, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे.

त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांसाठी सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये आताच बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या अशीच वाढत राहिली, तर शहरातील खासगी तसेच सरकारी यंत्रणांवर अतिरीक्त ताण येऊन शहरातील रुग्णांना वैद्यकीय उपचार करणे शक्य होणार नाही.

त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शहरात काही दिवस कडक संचारबंदी लागू करण्याची अत्यंत गरज आहे.

भाऊसाहेब भोईर : – लॉकडाऊन खुला केल्यापासून शहरात आता रुग्णांची संख्या 300 ते 325 च्या सरासरीने पुढे आहे. लोकांचा संपर्क वाढत चालला आहे. ही धोक्याची घंटा आहे. अवघ्या सात दिवसांत जवळपास 1300 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरात वाढले आहेत.

परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. पोलीस यंत्रणा, महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही कोरोनाने हैराण केले आहे. आपले आमदार, नगरसेवक आणि त्यांची कुटुंब व कार्यकर्तेसुध्दा कोरोना बाधित झाले आहेत.

अशा परिस्थितीत कोणी कोणावर नियंत्रण ठेवायचे हा प्रश्न आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी दहा दिवस कडक बंद करावा लागणार आहे.

शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे म्हणाल्या, शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. नागरिक घरात बसत नाहीत. आता पावसाळा चालू होत आहे. त्यामुळे सर्दी, ताप, थंडी आणि खोकल्याचे रुग्ण वाढणार आहेत. त्यामुळे कडक लॉकडाऊन करावा.

तसेच नगरसेविका सीमा सावळे यांनी देखील शहर बंद ठेवण्याची मागणी केली आहे. तर बाबू नायर यांनीही लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.