Pimpri : राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय श्रमिक आघाडी, गुणवंत कामगार कल्याण परिषद, लोकमान्य हॉस्पिटल व मानिनी फाउंडेशन यांच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात मदत करण्यात आली. नागरिकांची तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर आपत्तीग्रस्तांना सरकारने सहा महिन्यांमध्ये पक्की घरे बांधून द्यावीत अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे यशवंत भोसले यांनी केली आहे.

कामगार नेते यशवंत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील हळदी, शिरोली-दुमाला या पूरग्रस्त गावांना प्रत्यक्ष भेट देऊन मदत पोहचविण्यात आली. पुरामुळे अनेक घरे जमीनदोस्त झाल्याने शेकडो कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. करवीर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते हंबीरराव पाटील, अनिल सोलापूरे, विश्वासराव नारायण पाटील, सरपंच व सदस्य उपस्थित होते. त्यांच्यासोबत गावाची पाहणी केली.

वैद्यकीय पथकामध्ये लोकमान्य हॉस्पिटल यांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत श्रीखंडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने सुमारे एक हजाराच्यावर ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली. त्यांना मोफत औषधे देखील देण्यात आली. शिरोली-दुमाला येथील 550 विद्यार्थ्यांना यशवंत भोसले यांच्यावतीने वह्या, पेन, टिफिन, वॉटर बॅग देण्यात आले.

भारती चव्हाण यांच्या शुभहस्ते शिरोली या गावी पूरग्रस्तांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्धघाटन करण्यात आले. मानिनी फाउंडेशनच्यावतीने सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले. गुणवंत कामगार कल्याण परिषदेचे नेते स्वानंद राजपाठक, अण्णा जोगदंड, कोल्हापूर येथील गुणवंत कामगार सुहास वड्डीकर, शिवाजी चौघुले, भाई थोरात यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तसेच लोकमान्य हॉस्पिटल येथील कामगार नेते विठ्ठल ओझरकर, मधुकर काटे, नवनाथ जगताप, हनुमंत जाधव, अमोल घोरपडे, सोमनाथ वीरकर, प्रमोद चव्हाण, आकाश हिवराळे, संदीप काटे, गोपी म्हेत्रे यांनी विद्यार्थ्यांना दोन हजार वह्या व एक हजार पेनचे वाटप केले. या मोहिमेत पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडी पदाधिकाऱ्यांनी देखील सहभाग घेतला.

या सर्व पूरग्रस्त गावांमध्ये 30% पडलेल्या घरांची पाहणी यशवंत भोसले यांनी केली. जी घरे व त्यांची कुटुंबे पूर्णपणे उध्वस्त झालेली आहेत. तेथील राडारोडा व पडलेल्या भिंती, मातीचे ढिगारे हे त्वरित काढावेत. त्याच ठिकाणी आपत्तीग्रस्तांना शासनाने सहा महिन्यांमध्ये पक्की घरे बांधून द्यावीत अशी मागणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे भोसले यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.