Pimpri: बंडखोर नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांची ‘भाजप’मधून हकालपट्टी!

एमपीसी न्यूज – पिंपरी मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्या विरोधात बंडखोरी करणारे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई केल्याची माहिती भाजपच्या प्रदेश कार्यालयातून आज (गुरुवारी) देण्यात आली.

महायुतीत पिंपरी मतदारसंघ शिवसेनेला सुटला आहे. शिवसेनेने विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी बंडखोरी केली आहे. महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करुन ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे भाजपने आज ओव्हाळ यांची पक्षातून हकालपट्टी केली.

पिंपरी महापालिका निवडणुकीत रावेत -किवळे प्रभागातून बाळासाहेब ओव्हाळ भाजपच्या चिन्हावर नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. दरम्यान, त्यांनी काही दिवसांपुर्वी गुजरातमधील काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी यांचा कार्यक्रम देखील घेतला होता. त्यात मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली होती.

‘यांची’ही हकालपट्टी!
तुमसर मधी चरण वाघमारे, मीरा भाईंदरच्या गीता जैन, अहमदपूर, लातूरचे दिलीप देशमुख यांची देखील हकालपट्टी करण्यात आली आहे. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारे भाजप पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी भाजपचा राजीनामा दिला असल्याचे भाजपचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.