Pimpri: महापालिका मानधन तत्वावर 78 शिक्षकांची करणार भरती

शिक्षकांना तासिका 85 रुपये मानधन; मासिक साडेनऊ हजार रुपये वेतन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विभागातील मराठी माध्यमाकरिता 60 आणि उर्दू माध्यमाच्या शाळांसाठी 18 अशा 78 शिक्षकांची मानधन तत्वावर भरती करण्यात येणार आहे. शिक्षकांना घड्याळी तासिका 85 रुपये तर मासिक साडेनऊ हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20 या वर्षातील दहा महिन्यांसाठी शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी येणा-या 74 लाख 10 हजार रुपये खर्चास स्थायी समिती सभेत आज (शुक्रवारी) मान्यता देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विभागाअंतर्गत मराठी माध्यमाचे 18 विद्यालये आणि उर्दू माध्यमाची सहा विद्यालये कार्यरत आहेत. या विद्यालयांमधून गतवर्षी 8172 विद्यार्थी शिक्षण घेत होते. दहावीचा सरासरी निकाल, विद्यार्थ्यांना देण्यात आलेली बक्षिसे, नैसर्गिक वाढ या तत्वावर विद्यार्थी व तुकडी संख्येत वाढ होत आहे.

  • सध्या तुकडींच्या संख्येनुसार काही विषयांचे शिक्षक, सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती व रजा आदी कारणामुळे शिक्षकांची संख्या कमी झाली असून विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे शिक्षकांची नेमणूक करणे आवश्‍यक आहे.

मुख्याध्यापकांनी वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार महापालिका माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सरकारच्या निर्णयानुसार महापालिका विद्यालयात 54 रुपये तासिकेप्रमाणे दर आहे. गतवर्षी एकत्रित मानधनावर आठ हजार शिक्षकांची नेमणूक केली होती. तथापि, एकत्रित मानधनावर नियुक्ती केल्यास शिक्षक न्यायालयात याचिका दाखल करतात. त्यामुळे घड्याळी तासिकेवर शिक्षक नेमण्यात येणार आहेत. सरकारच्या निर्णयानुसार तासिका दर 54 रुपये असून त्यानुसार मासिक 5 ते 5500 हजार मानधन होते. यावर शिक्षक उपलब्ध होत नसल्याने महापालिका स्तरावर समिती गठित केली. पुणे महापालिकेत एकत्रित दहा हजार रुपये मानधन दिले जाते.

  • पिंपरी महापालिकेच्या माध्यमिक विभागामध्ये पुणे महापालिकेच्या अनुषंगाने दहा हजार रुपये मानधन देण्याकरिता घड्याळी तासिका दर 85 रुपये देण्यास समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार मराठी माध्यमाकरिता 60 आणि उर्दू माध्यमाच्या शाळांसाठी 18 अशा 78 शिक्षकांची मानधन तत्वावर भरती करण्यात येणार आहे.

शिक्षकांना घड्याळी तासिका 85 रुपये तर मासिक साडेनऊ हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक आठवड्याला सरासरी 28 तास होत असून महिन्याला साडेनऊ ते दहा हजार रुपये मानधन शिक्षकांना मिळू शकेल. यासाठी येणा-या 74 लाख 10 हजार रुपये खर्चास स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.