Pimpri : शहराचा पाणीपुरवठा नियमित करा- श्रीरंग बारणे यांची आयुक्तांना इशारावजा सूचना

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरणात 97 टक्के पाणीसाठा झाला आहे. आज (शनिवार)पासून धरणातून पाण्याचा विसर्ग देखील सुरु केला आहे. तरीही दिवसाआड पाणी येत असल्याने भर पावसाळ्यात नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा आता सुरळीत करावा, अशी इशारावजा सूचना शिवसेना पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पालिका आयुक्तांना केली.

खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शनिवारी) आयुक्त कार्यालयात पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे, शहराध्यक्ष योगेश बाबर, नगरसेवक निलेश बारणे, उर्मिला काळभोर, सरिता साने, रेखा दर्शिले, सचिन भोसले, अनंत को-हाळे, रोमी सिंधू, राजेश वाबळे, शैला पाचपुते, बाळू दर्शिले, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

  • आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना भर पावसाळ्यातही एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. पवना धरण परिसरात भरपूर पाऊस झाला आहे. पवना धरण 97 टक्के भरले आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधा-यातून पाणी उचलण्यात येते. नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करणे बंधनकारक असताना देखील प्रशासन एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आडमुठे धोरण अवलंबित आहे. 11 जुलै रोजी पत्र देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत विनंती करण्यात आली होती. मात्र, अजूनही महापालिका प्रशासनाने त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.

यावेळी खासदार बारणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात कामगारवर्ग राहतो. तसेच बहुमजली सोसायट्या मोठ्या प्रमाणात शहरात आहेत. एक दिवसाआड पाणीपुरवठा केल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पवना धरण जवळपास 100 टक्के भरले असतानाही शहराला पाणीपुरवठा सुरळीत नाही, ही घटना शहरात प्रथमच घडत आहे. भर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना देखील नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. टँकरवाले नागरिकांना लुटण्याचा प्रकार करतात. त्या टँकरवाल्यांना पोसण्याचे काम पालिका प्रशासन करत आहे का ?असा सवाल देखील खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी उपस्थित केला.

  • शिवसेना पक्ष पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या पाठीशी उभा आहे. पालिका प्रशासनाने एक दिवसाआड पाणीपुरवठा बंद करून नियमित पाणीपुरवठा सुरु करावा. दररोज किमान एक वेळ तरी पाणीपुरवठा करता येईल. जनतेला वेठीस धरण्याचे काम करू नये. 24×7 च्या पाणीपुरवठा योजनेसाठी सव्वाशे कोटींची निविदा काढून देखील ते काम वेळेत काम पूर्ण झाले नाही. प्रशासनाने ठेकेदारांना पोसण्याचे काम केले आहे. तसेच अमृत योजना आणि जेएनएनयुआरएम अंतर्गत देखील कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला. पण, यातूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. हा प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे, असेही खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “सध्या शहरात एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. पवना धरण देखील जवळपास भरले आहे. पाण्याचा विसर्ग देखील सुरु झाला आहे. आता धरण भरलेले असले तरी पुढील दोन महिन्यातील मान्सूनचा अंदाज घेऊन पाणी पुरवठ्याबाबत निर्णय घेण्यात येतो. त्यामुळे पाणीपुरवठा नियमित करण्याबाबत महापौर आणि प्रशासनाशी चर्चा करून त्यावर तोडगा काढला जाणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.