Pimpri: अवैध फ्लेक्स स्व:खर्चाने काढणार; त्या बदल्यात जाहिरात उभारणीचे साहित्य घेणार

अवैध फ्लेक्स हटविण्याचे काम एका नागरिकाला; स्थायी समितीची मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विनापरवाना किऑक्स, फ्लेक्स, बोर्ड, जाहिरात फलकांमुळे होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी एका नागरिकाने पुढाकार घेतला आहे. शहरातील अवैध फ्लेक्स, जाहिरात फलक हटविण्याचे काम ते स्वत: स्व:खर्चाने करणार आहेत. त्या मोबदल्यात जाहिरात उभारणीसाठी वापरलेले बांबू, चौकटी, किऑक्स, फ्लेक्स, बोर्ड, जाहिरात फलक असे साहित्य ते स्वत: घेणार आहेत. सरदार रविंद्रसिंग असे त्यांचे नाव आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आज (बुधवारी) झालेल्या सभेत मान्यता देण्यात आली. फ्लेक्स काढताना त्यांच्यासोबत महापालिकेचा एक अधिकारी आणि संरक्षणासाठी एक पोलीस असणार आहे.

महापालिका क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील अतिक्रमण विभाग एकत्रित करून मुख्यालय स्तरावर नविन विभाग स्थापन करून हे कामकाज बांधकाम परवानगी व अवैध बांधकाम नियंत्रण विभागाकडे वर्ग करण्यात आले. त्याअनुषंगाने बांधकाम परवानगी आणि अवैध बांधकाम नियंत्रण विभागामार्फत विनापरवाना अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येते. विनापरवाना जाहिरातीमुळे शहराचे होणारे विद्रुपीकरण आणि वाहतुकीला होणारा अडथळा यामुळे सातारा येथील सुस्वराज्य फाऊंडेशन आणि इतर यांनी राज्य सरकार विरोधात सन 2011 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने निकाल दिला.

  • या निकालामध्ये अवैध जाहिराती, घोषणा फलक, होर्डींग्ज, पोस्टर्स याबाबत तक्रार आल्यास या तक्रारींवर 72 तासात कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार, अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत अवैध बांधकामांवर, वाहतुकीस अडथळा ठरणा-या, रस्ते, चौक, महापालिकेच्या जागा येथील हातगाडी, टप-या यावर तसेच शहरातील विनापरवाना फ्लेक्स, बॅनरवर कारवाई केली जाते. तथापि, कामाच्या बोजामुळे संबधित यंत्रणेला ही विनापरवाना, अवैध अतिक्रमणे 72 तासात हटविणे शक्य होत नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नाही.

शहरातील विनापरवाना किऑक्स, फ्लेक्स, बोर्ड, जाहिरात फलकांमुळे होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी सरदार रविद्रसिंग यांनी एक उपक्रम राबविण्याबाबत महापालिकेला पत्र दिले. या पत्रात शहरातील अवैध किऑक्स, फ्लेक्स, बोर्ड, जाहिरात फलक, जाहिरातीचे स्ट्रक्चर काढणे ही कामे ते स्वत:च्या खर्चाने करणार आहेत, असे नमूद केले. या कामासाठी लागणारे मनुष्यबळ, वाहने आणि इतर यंत्रणा ते स्वत: पुरवणार आहेत. त्याच्या मोबदल्यात जाहिरात उभारणीसाठी वापरलेले बांबू, चौकटी, किऑक्स, फ्लेक्स, बोर्ड, जाहिरात फलक असे साहित्य ते स्वत: घेणार आहेत.

  • सध्या शहरातील विनापरवाना किऑक्स, फ्लेक्स, बोर्ड, जाहिरात फलक काढण्याचे काम महापालिका कर्मचा-यामार्फत करण्यात येते. जप्त केलेले साहितय महापालिका गोदामात जमा केले जाते. त्यानंतर महापालिकेमार्फत त्याचा लिलाव केला जातो. मात्र, प्लास्टीक, कापड, बांबू, लाकुड या स्वरूपाचे साहित्य गोदामात निरूपयोगी होते. सरदार रविंद्रिंसग यांच्घ्या प्रस्तावाचा विचार केल्यास निरूपयोगी साहित्याच्या बदल्यात महापालिकेला मनुष्यबळ, वाहने उपलबध होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन प्रायोगिक तत्वावर तीन महिने रविंद्रसिंग यांना महापालिका हद्दीतील अवैध किऑक्स, फ्लेक्स, बोर्ड, जाहिरात फलक, जाहिरातीचे स्ट्रक्चर काढण्याचे काम देण्यात येणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.