Pimpri: नाशिक फाट्यापर्यंतचे बॅरीकेडस्‌ हटवा अन्‌ रस्ता वाहतुकीस खुला करा 

महापालिकेची महामेट्रोला सूचना

एमपीसी न्यूज – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी ते नाशिक फाटा दरम्यान काम पूर्ण झालेल्या ठिकाणचे बॅरीकेडस्‌  30 एप्रिलपर्यंत काढून टाकावेत. रस्ता  वाहतुकीस खुला करावा अशी सूचना महापालिकेच्या वतीने महामेट्रो प्रशासनाला करण्यात आली.

स्थायी सभापती विलास मडिगेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत महामेट्रो आणि महापालिका अधिका-यांची एकत्रित बैठक नुकतीच पार पडली. यावेळी या सूचना देण्यात आल्या. या बैठकीला मेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बि-हाडे, महापालिकेचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, बापू गायकवाड आदी उपस्थित होते.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पहिल्या टप्प्यातील पिंपरीपर्यंतच्या मेट्रोचे काम सुरु आहे. फिनोलेक्‍स चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक यादरम्यानचे काम केव्हा पूर्ण होईल, याबाबत कोणतीही माहिती मिळत नाही. या मार्गावर पिंपरी महापालिकेची इमारत आहे. त्यामुळे पिंपरीत नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यातच मेट्रोचे काम संथगतीने चालू असल्याने रस्ता अरुंद झाला. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. महापालिकेत प्रवेश करणे अवघड होत आहे. त्यामुळे या भागातील वायाडक्टचे काम पूर्ण करावे, रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे. 30 एप्रिलपर्यंत रस्ता वाहतुकीस खुला करण्यात यावा.

एचए कंपनीजवळ काही बॅरीकेडस्‌ काढल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत नाही. मात्र पुढील मार्गावर  बॅरीकेडस्‌ असल्याने वाहतुकीसाठी एकच लेनशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीचा मोठा ताण असतो. नागरिक व पदाधिका-यांना महापालिका भवनात ये-जा करतानादेखील अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व भागाची मेट्रोच्या अधिका-यांनी पाहणी करावी. तसेच काम पूर्ण झालेल्या ठिकाणचे बॅरीकेडस्‌ काढून टाकण्याविषयी संबंधितांना निर्देश  द्यावेत, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. याशिवाय शक्‍य त्याठिकाणी रात्री काम करण्यावर भर देऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.