Pimpri : मॉल, मल्टिप्लेक्समधील पार्किंग निःशुल्क करा; मनसेची मागणी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही शहरातील मॉल, मल्टिप्लेक्समध्ये पार्किंग निःशुल्क करावे, अशी मागणी मनसेने महापालिकेकडे केली आहे.

याबाबतच्या मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने ठराव करत पुणे शहरातील मॉल व मल्टिप्लेक्समध्ये पार्किंग शुल्क आकारण्याबाबतचा ठराव केला आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील मॉल, मल्टिप्लेक्स या ठिकाणी पार्किंग निःशुल्क करावे अन्यथा आंदोलन केले जाईल.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मॉल, मल्टीप्लेक्स, हॉस्पिटल, इत्यादी ठिकाणी पार्किंग शुल्क दहा रुपयांपासून 100 रुपये पर्यंत आकारले जाते. अनेक संस्थानी यावर आवाज उठविला. परंतु त्यावर प्रशासनाने दुर्लक्ष केले. ही बाब आता न्यायालयात गेली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार आणि धोरणानुसार मॉल, मल्टिप्लेक्स याठिकाणी पार्किंग शुल्क आकारणे बेकायदेशीर आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

शिष्टमंडळात शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हेमंत डांगे, सचिव रुपेश पटेकर, महिला सचिव सीमा बेलापुरकर, उपाध्यक्ष चंद्रकांत दानवले, राजु सावळे, विभाग अध्यक्ष प्रतीक शिंदे, मयूर चिंचवडे, उपविभाग अध्यक्ष सुरेश सकट आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.