Pimpri : पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘जिजाऊनगर’ करा; शहरात झळकले फ्लेक्स

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे नाव (Pimpri) बदलण्याची मागणी पुढे आली आहे. 350 व्या शिवराज्याभिषेक दिनीचे औचित्य साधून शहराचे जिजाऊनगर नामकरण करण्याच्या मागणीचे फ्लेक्स शहरात सर्वत्र झळकले आहेत. भक्ति – शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश बारणे यांनी फ्लेक्सद्वारे ही मागणी केली आहे.

बारणे म्हणतात, स्वराज्य हा एक विचार होता… ते एक स्फुल्लिंग होते. या विचाराला मूर्त रूप देणारे शिवराय जरी असले तरी त्या विचाराचे बीज जिच्या मनात अंकुरले होते, त्या होत्या माँ साहेब जिजाऊ. हे स्वप्न त्यांनी प्रथम पाहिले होतं. ज्या पावन भूमीत हे स्वप्न त्यांनी पाहिलं, जिथे त्यांनी ते रुजवलं तो हाच परिसर… मावळ – मुळशी पट्ट्यात स्वराज्याच्या गाथेचे धगधगते अध्याय लिहिले गेले.

जिजाऊंच्या मार्गदर्शनाने शिवबांनी हे स्वराज्य वाढवले आणि मावळ्यांनी ते प्राण पणाने जपले हा तेजस्वी इतिहास आहे. याचाच एक परिणाम म्हणजे पिंपरी-चिंचवडला आक्रमकांचे नाव मिळण्यापासून वाचले. सुमारे साडेतीनशे वर्षांपासून आपण स्वाभिमानाने आपली ओळख टिकवू शकलो यामागे प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष माँ साहेब जिजाऊच आहेत.

Pimpri : मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पालखी सोहळ्यासोबत पिण्याच्या पाण्याचे चार टँकर

माँ साहेब जिजाऊंना आपण काय दिले? शिवरायांच्या महानतेने संपूर्ण महाराष्ट्र ओळखला जातो. पण, त्या शिवरायांना घडविणाऱ्या जिजाऊंच्या नावाने मात्र त्याच महाराष्ट्रात आजच्या घडीला एकही शहर नाही. आपण आपल्याला जिजाऊंची लेकरे मानतो. जिजाऊंनी शिवबाला दिलेला स्वाभिमानी बाणा पुरा मावळपट्टा उराशी बाळगतो. मागील काही दशकांत पिंपरी-चिंचवडने याच स्वाभिमानाच्या ताकदीवर बदलत्या काळानुरूप आपली नवीन औद्योगिक ओळख निर्माण केली.

पण आईकडून सतत घेणाऱ्या मुलांनी आयुष्यात एकदा तरी (Pimpri ) आईला काही तरी द्यायला सुद्धा शिकले पाहिजे. माँ साहेब जिजाऊंच्या ऋणातून आपण कधीच उतराई होवू शकत नाहीत. परंतु, त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून पिंपरी-चिंचवड सारख्या भारतातील औद्योगिक विकासात अग्रणी असणाऱ्या शहराला जिजाऊंचे नाव देवून जिजाऊंचा यथोचित सन्मान करायलाच हवा.
आपण जिजाऊंचे आणि शिवबाचे मावळे आता गप्प बसून चालणार नाही. सनदशीर आणि शांततेच्या मार्गाने आपण या लढ्यात सामील होवू आणि 350 व्या शिवराज्याभिषेक दिनी हा संकल्प करू व तो 351 व्या शिवराज्याभषेक दिनापर्यंत पूर्ण करणारच हा विश्वास बाळगून लढत राहूयात, असे मत बारणे यांनी व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.