pimpri: ‘महापालिका प्रवेशद्वारावरील ‘व्हीजीटर’ व्यवस्थापनाची सिस्टीम अद्यावत करा’ 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारसमोरील  ‘व्हीजीटर’ व्यवस्थापनाची सिस्टीम अद्यावत करण्याची मागणी स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांनी केली आहे. त्यासाठी दोन संगणक संच उपलब्ध करुन देण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

महापालिकेची चार मजली प्रशासकीय इमारत आहे. इमारतीच्या तिस-या मजल्यावर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्षनेता यासह विविध विषय समित्यांच्या सभापतींची दालने आहेत. या इमारतीमध्ये शहरातील नागरिक आपल्या विविध कामांसाठी, त्याचे निराकरण करण्यासाठी दररोज येत असतात. या नागरिकांची नोंद घेण्यासाठी हस्तलिखीत गेट पास देण्यात येत आहे. सन 2012 ते 2016 या काळात गेट पास संगणकीय मशिनद्वारे दिला जात होता. संगणक जुन्या मॉडेलचा असल्याने तो बंद पडला आहे. त्यामुळे पुन्हा हस्तलिखीत गेट पास देण्यात येत आहे.

त्यासाठी व्हिजीटर व्यवस्थापन सिस्टीम सॉफ्टवेअरसह दोन संगणक संच सुरक्षा विभागास उपलब्ध करुन देण्यात यावा. या सॉफ्टवेअर यंत्रणेमध्ये व्हिजीटरच्या फोटोची सोय असावी. त्याचबरोबर व्हिजीटरच्या डेटा भरण्यासाठी त्यांची संपूर्ण माहिती घेण्याची व्यवस्था असावी. सोयी-सुविधा देऊन व्यवस्था अद्यावत करावी, अशी मागणी मडिगेरी यांनी केली आहे. याबाबत माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांना निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.