Pimpri : औद्योगिक परिसरातील समस्या सोडवण्याची एमआयडीसीच्या ‘सीईओ’कडे मागणी

पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील विविध समस्या आहेत. या समस्यांनी लघुउद्योजकांना ग्रासले आहेत. या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेने एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनग बलगन यांच्याकडे केली.

एमआयडीसी तर्फे पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक संघटनांसाठी पुणे येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये अनग बलगन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अनग बलगन यांची भेट घेतली. पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योगांच्या समस्याबाबत निवेदन दिले. संघटनेचे संचालक प्रमोद राणे, एमआयडीसीचे पुणे प्रदेशिक अधिकारी देशमुख उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेला सर्वात जास्त महसूल औद्योगिक क्षेत्राकडून मिळतो. परंतु, या परिसरात भुयारी गटार, रस्ते मुलभूत सुविधा पुरविल्या जात नाहीत. त्यामुळे एमआयडीसीने टाउन शिप कार्यान्वित करून या परिसराचा विकास करावा. औद्योगिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हिंजवडी एमआयडीसीप्रमाणे पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात कचरा विलगीकरण केंद्र उभारावे. कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी .

निवासी भागातील उद्योगांचे औद्योगिक परिसरात पुनर्वसन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने टी-201 पुनर्वसन प्रकल्प एमआयडीसीकडून जागा घेऊन उभारण्यास सुरवात केली. परंतु, महापालिकेच्या गलथान कारभारामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे एमआयडीसीने आकारलेले विलंब शुल्क रद्द करण्यात यावे, अशा मागण्या निवेदनातून केल्या आहेत. संघटनेच्या या मागण्याबाबत मंत्र्यांसमवेत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनग बलगन यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.