Pimpri: पिंपरी येथील रक्तदान शिबिराला युवकांसह महिलांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज – भारतात सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात निर्माण झालेल्या रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या आवाहनाला साथ देत नगरसेवक संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करण्यासाठी पिंपरीतील अनेक युवकांसह महिलांचा प्रतिसाद मिळाला.

नगरसेवक संदीप वाघेरे आणि संदीप वाघेरे युवा मंच व विश्व सिंधी सेवा संगम यांच्या संयुक्त विद्यमाने आज (सोमवारी) पिंपरी येथील नागरी सुविधा केंद्र या ठिकाणी हे शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

विशेष म्हणजे यामध्ये महिला रक्तदात्यांचा आकडादेखील लक्षणीय आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी रंजना जाधव, हरिष वाघेरे, जयेश चौधरी, श्रीकांत वाघेरे, किरण वाघेरे, गणेश मंजाळ, किरण शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.

कोरोना विषाणू हे देशावर आलेले महाभयंकर संकट असून या संकटाचा प्रत्येकाने एकजुटीने सामना करण्याची आवश्यकता आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना विरोधात खंबीरपणे उभे राहून लढत आहेत. अशावेळी या छोट्याशा उपक्रमाच्या माध्यमातून या लढाईत आपलेही योगदान देण्याचा आमचा प्रयत्न असून आजच्या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करणाऱ्या सर्व नागरिकांचे आणि विशेषतः महिला भगिनींचे आभार व्यक्त करतो.   संदीप वाघेरे : नगरसेवक.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.