Pimpri: पाणीपुरवठा आठ दिवसांत पूर्ववत करा; अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन

शिवसेनेचा इशारा; शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट, दुषित पाण्याची बाटली दिली आयुक्तांना भेट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात मुबलक पाणीसाठा आहे. केवळ नियोजनाचा अभाव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निष्क्रियतेमुळेच शहरवासीयांना हिवाळ्यातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करत एकदिवसाआड पाणीपुरवठा केल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक बेहाल झाले आहेत. येत्या आठ दिवसांत पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात यावा. अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला आहे. तसेच आयुक्तांना दुषित पाण्याची बाटली भेद दिली.

महापालिका पाणीपुरवठा विभागाने 25 नोव्हेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यासाठी समन्यायी पाणीवाटपाचे कारण पुढे केले. तथापि, एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्यापासून शहरातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. कमी दाबाने आणि दुषित पाणी येत आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज (शनिवारी) आयुक्त श्रावण हर्डीकर यांची चिंचवड, अॅटो क्लस्टर येथे भेट घेतली. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याची समस्या त्यांच्यासमोर मांडली.

खासदार बारणे म्हणाले, ”शहरात कृत्रीम पाणीटंचाई निर्माण केली आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने सुधारणा झाली नाही. त्याउलट तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. संपुर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. प्रशासनाकडून तक्रारींना केराची टोपली दाखविली जाते. पाणी, कचरा, खड्डे या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असून नागरिकांना वा-यावर सोडले आहे. दुषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरवासीय बेहाल झाले आहेत. येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा पुर्ववत करावा. अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल. शहारातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मदत केली जाईल” असेही त्यांनी सांगितले.

माजी खासदार आढळराव म्हणाले, ”प्रशासन आणि आयुक्त पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात अपयशी ठरले आहेत. आजपर्यंत उन्हाळ्यात सुद्धा कधीच पाणीटंचाई जाणवली नाही. आता हिवाळ्यातच पाणी टंचाई जाणवत आहे. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास नागरिकांचा उद्रेक होईल. आयुक्तांनी विभागप्रमुखांच्या उपस्थित पाणीकपाताची निर्णय घेतला आहे. पाणीकपात मागे घेण्यासाठी गटनेत्यांच्या मान्यतेची गरज नाही. त्यामुळे तत्काळ पाणीकपात मागे घेऊन शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा सुरु करावा”.

”आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. हे काम वेगात करण्यासाठी अनेक मी वर्षांपासून प्रयत्न करत आहे. परंतु, नियोजनाचा अभाव असलेले प्रशासन काहीच करत नाही. पुणे महापालिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे”, असेही ते म्हणाले.

सुलभा उबाळे म्हणाल्या, ”निगडी परिसरात अत्यंत कमी दाबाने आणि दुषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पोटाचे आजार झाले आहेत. प्रशासन निष्क्रिय ठरले आहे. प्रशासन मनमानी पद्धतीने कामकाज करत आहे. यापुढे मनमानी चालू दिली जाणार नाही”.

जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिरुर जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे, सहसंपर्क प्रमुख, कामगार नेते इरफान सय्यद, महापालिका गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका मीनल यादव, शहरसंघटिका उर्मिला काळभोर, सरिता साने, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, चिंचवड विधासभा प्रमुख अनंत को-हाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, आशा भालेकर आदी शिष्टमंडळात सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.