Pimpri: विद्यार्थी शिक्षणासाठी बालचित्रवाणी परत सुरू करा, आमदार लक्ष्मण जगताप यांची मागणी

Pimpri: Resume balchitravani for student education, demand by Laxman Jagtap ऑनलाइन शिक्षण सर्वच विद्यार्थ्यांना घेणे शक्य नाही. विशेषतः ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण परवडणारे नाही.

0

एमपीसी न्यूज- राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पण ऑनलाइन शिक्षणासाठी लागणारी अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईल, टॅब, इंटरनेट यांसारखी अत्याधुनिक साधने ग्रामीण आणि शहरी भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यी शिक्षणासाठी बालचित्रवाणी परत सुरू करावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे ई-मेल द्वारे केलेल्या मागणीत जगताप म्हणतात की, उपग्रहाद्वारे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने 1984 मध्ये केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था अर्थात बालचित्रवाणी या संस्थेची पुण्यात स्थापना केली.

ही संस्था 1984 ते 1992 पर्यंत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या संस्थेची संलग्न संस्था म्हणून कार्यरत होती. या संस्थेवर राज्य सरकारचे संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण होते.

पुढे 1992 मध्ये सरकारने बालचित्रवाणी या संस्थेची सार्वजनिक विश्वस्त संस्था कायद्यांतर्गत नोंदणी करून स्वायत्त केली.

बालचित्रवाणी संस्थेच्या नियामक मंडळाने 3 एप्रिल 2017 रोजी संस्था बंद केली. राज्य सरकारने बालचित्रवाणी या संस्थेला पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील 5 एकर जागा दिली आहे.

त्यावर केंद्र शासनाने बांधून दिलेली इमारत, व्हिडिओ व ऑडिओ कार्यक्रम सादर करण्याचा मोठा स्टुडिओ, एडिटिंग युनिटची मोठी यंत्रसामुग्री, संस्थेने निर्मिती केलेले सुमारे 6 हजार शैक्षणिक व्हिडिओ कार्यक्रम आहेत.

सध्या या बालचित्रवाणीचा ताबा बालभारतीकडे आहे. बालचित्रवाणीने तयार केलेल्या शैक्षणिक कार्यक्रमांचे दूरदर्शनवर तब्बल 30 वर्षे प्रसारण केले जात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या दर्जेदार शिक्षण दूरदर्शनवरून घेता येत होते.

सध्या कोरोना महामारीमुळे शाळा बंद असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

मात्र, ऑनलाइन शिक्षण सर्वच विद्यार्थ्यांना घेणे शक्य नाही. विशेषतः ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण परवडणारे नाही.

कारण ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल किंवा टॅब तसेच इंटरनेट उपलब्ध असणे गरजेचे आहे. ही साधने गोरगरीब विद्यार्थ्यांजवळ उपलब्ध नाहीत.

अशा स्थितीत राज्यातील विद्यार्थ्यांना अगदी कमी खर्चात सहजपणे ऑनलाइन शिक्षण कसे उपलब्ध होईल, याचा विचार होणे गरजेचे आहे.

त्यासाठी बालचित्रवाणी ही संस्था उपयुक्त ठरू शकते. या संस्थेमार्फत सर्व इयत्तांचे शैक्षणिक कार्यक्रम तयार करून ते उपग्रहाद्वारे रेडिओ आणि दूरदर्शनवरून प्रसारण केल्यास सर्वच विद्यार्थ्यांसाठी सोयीचे आणि फायदेशीर ठरेल.

याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर गांभीर्याने विचार व्हावा आणि राज्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी बालचित्रवाणी ही संस्था पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like