Pimpri: क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुल येथे विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा

एमपीसी न्यूज – क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमासाठी रोटरी क्लब सभासद केशव मानगे, लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्सच्या अध्यक्षा उज्वला कुलकर्णी, लायन प्रदीप कुलकर्णी, शाळीग्राम, विनय देशपांडे, नगरसदस्य सचिन भोसले, नगरसदस्या झामा बारणे, उद्योजक प्रकाश बाबेल, उद्योजक जीवन भूमकर, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, शरद जाधव, सुनिता शिंदे, शाला समिती अध्यक्ष प्रा. निता मोहिते, नितीन बारणे आदी उपस्थित होते.

भारतमातेच्या जयघोषाने परिसरात निघालेल्या प्रभातफेरीने सर्वांच्या मनात उत्साह निर्माण झाला. राष्ट्रगीत, ध्वजगीत, समुहगीत याबरोबरच संचालक सदस्य आसाराम कसबे लिखित क्रांतिवीर चापेकर बंधू स्तवन गीत गायन हे यावेळेच्या प्रजासत्ताक दिनाचे वैशिष्ट्य ठरले.

तसेच यानिमित्ताने बालवर्ग ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात व्यक्त केलेली अभ्यासपूर्ण मनोगते मान्यवरांच्या विशेष कौतुकास पात्र ठरली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त बालवर्ग व दहावीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांचे ‘सर्वांगसुंदर व्यायामाने’ या गीतावर आधारित साधनयुक्त कवायत प्रकार, सातवीच्या विद्यार्थ्यांचे लेझीम आणि मानवी मनोरे अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरणाने विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. शिवाजी पोळ यांनी गायलेल्या भावपूर्ण देशभक्तीपरगीताने सीमेवरील जवानांप्रती असलेल्या भावना अधिक दृढ झाल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष केशव मानगे यांनी रोटरी क्लब तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अडीच लाख रुपये किमतीचे 80 बाक भेट दिले. तर लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्स तर्फे प्रेसिडेंट उज्वला कुलकर्णी यांनी शाळेच्या ग्रंथालयासाठी काही निधी देवू केला. तसेच उद्योजक जीवन भूमकर यांनीही भविष्यात शाळेसाठी काही मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर यांनी केले. तर विद्यार्थ्यांनी बनविलेले कागदीपुष्प देऊन मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा आखाडे यांनी केले. स्मिता जोशी यांनी आभार मानले. वंदे मातरम् झाल्यावर खाऊ वाटपाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.