Pimpri : विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई करा, अन बक्षीस मिळवा !

पोलीस आयुक्तांची पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अनोखी योजना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी एका अनोख्या योजनेची घोषणा केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही ठिकाणी विरुद्ध दिशेने येणा-या वाहनावर कोणत्याही पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचा-याला कारवाई करता येणार आहे. जे पोलीस कर्मचारी विरुद्ध दिशेने येणा-या वाहनांवर कारवाई करतील, त्या पोलीस कर्मचा-यांना पोलीस आयुक्त बक्षीस (रिवार्ड) देणार आहेत.

आज (गुरुवारी) पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस अधिका-यांची बैठक घेतली. त्या बैठकीत या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर आयुक्तालयाच्या हद्दीत कोठेही विरुद्ध दिशेने वाहन आल्यास त्यावर भारतीय दंड संहिता कलम 279 अन्वये कारवाई करू शकणार आहे. पोलीस कर्मचा-याने संबंधित चालकावर कायदेशीर कारवाई करून त्याचा वाहन चालविण्याचा परवाना आयुक्तांकडे घेऊन गेल्यानंतर आयुक्त संबंधित कर्मचा-याला बक्षीस (रिवार्ड) देणार आहेत.

सर्वात जास्त वाहनांवर कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचा-याला एका मोटारसायकलवर कारवाई केल्यानंतर 100 रुपये आणि एका कारवर कारवाई केल्यानंतर 500 रुपये बक्षीस म्हणून आयुक्तांकडून मिळणार आहेत. यामुळे बेशिस्त वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात लगाम लागणार आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रोचे काम सुरु असल्याने ठिकठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. त्यात विरुद्ध दिशेने एखादे वाहन आल्यास वाहतुकीस मोठा अडथळा होतो. या बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन म्हणाले, “बेशिस्त वाहतूक हा शहराच्या विद्रुपीकरणाचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत करून त्याला शिस्त लावणे सर्वात महत्वाचे आहे. सध्या वाहतूक पोलीस चांगल्या पद्धतीने कारवाई आणि वाहतुकीचे नियोजन करत आहेत. मात्र त्यात सुधारणा आणि सर्व पोलिसांचा सहभाग वाढविण्यासाठी नवीन योजना सुरु करण्यात येत आहे. यामुळे सर्वच पोलीस उत्साहाने काम करतील. बक्षिसाची रक्कम महत्वाची नसून आपण करत असलेल्या कामगिरीची दखल वरिष्ठ घेत आहेत, ही भावना कर्मचा-यांमध्ये जागवली जाईल. यापुढे देखील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आणखी उपाय योजना करण्यात येणार आहेत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.