Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात सर्वात श्रीमंत महापालिका आणि सर्वात गरीब पोलीस आयुक्तालय

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांची खंत

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे केवळ कार्यक्रमापुरते पाहिले जाते. एखादा कार्यक्रम असेल तेंव्हा सर्वजण आयुक्तालयाला मदत करण्याचा आव आणतात पण प्रत्यक्षात मदतीचा हात कोणीच देत नाही. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर पोटतिडकीने प्रयत्न देखील कोणी करताना दिसत नाही. पिंपरी चिंचवड शहराला एकीकडे सर्वात श्रीमंत महापालिका आहे. तर दुसऱ्या बाजूला सर्वात गरीब पोलीस आयुक्तालय आहे, अशी खंत पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड शहराचे आयुक्तालय सुरु होऊन अडीच महिने झाले तरीही आयुक्तालयाला अद्याप मनुष्यबळ व गाड्या उपलब्ध झाल्या नाहीत. उलट पुणे पोलीस आयुक्तालयाने दिलेले मनुष्यबळ पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालायाकडे जास्त झाले असल्याचे सांगत ते अतिरिक्त मनुष्यबळ परत मागविले आहे. प्रत्यक्षात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला गरजेपुरते सुद्धा मनुष्यबळ मिळालेले नाही. संपूर्ण महाराष्ट्रातून 300 पोलीस कर्मचा-यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात येण्यासाठी अर्ज केले आहेत. त्याला आयुक्तालयाने मंजुरी दिली आहे. मात्र त्या कर्मचाऱ्यांच्या सध्या नेमणुकीच्या ठिकाणाहून केवळ 40 जणांना परवानगी देण्यात आली आहे. यामुळे मनुष्यबळाचा प्रश्न अजूनही बिकटच आहे.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात जे अधिकारी सरळ नियुक्त झाले आहेत, त्यांच्या अद्याप पगार झालेला नाही. दिवाळीसारखा सण आठवड्यावर आला आहे, परंतु पगार झालेला नसल्याने अधिकारी निराश आहेत. त्यासाठी आयुक्तालयाकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरु आहे. प्रशासनाकडून देखील काही कागदपत्रे येणे बाकी आहे. परंतु जे अधिकारी आणि कर्मचारी पुणे पोलीस आयुक्तालयाकडून वर्ग झाले आहेत त्यांच्या पगाराबाबत कोणतेही अडचण नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.

गुन्हेगारी बाबत बोलताना आयुक्त म्हणाले, “पिंपरी चिंचवड शहरात देहूरोड, चाकण, राजगुरूनगर सारख्या परिसरात गुन्हेगारांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसते. या भागातल्या गुन्हेगारांकडे वेळीच कोणी लक्ष दिले नसल्याने ही गुन्हेगारी वाढली असल्याचे दिसत आहे. मागील 15 ते 20 वर्षांपासून शहराला ही कीड लागली आहे. ही कीड घालवण्यासाठी पोलिसांकडून आता ठोस उपाय केले जात आहेत. एखाद्या आरोपीला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्याऐवजी पोलीस स्वतः गुन्हेगारांचा शोध घेऊन चौकशी करत आहेत. यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण होईल”

शहरातील सर्व प्रकारच्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचण्यासाठी जागोजागी तक्रार पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण केले जात आहे. मात्र या तक्रार पेट्यांना अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. नागरिकांच्या तक्रारी, गुन्हे, कायदा आणि सुव्यवस्था या तीन गोष्टींवर सध्या आयुक्तालयाने लक्ष केंद्रित केले आहे. तक्रारी देण्यासाठी नागरिकांनी पुढे यायला हवे, असे आवाहन देखील आयुक्तांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.