Pimpri: कर्जाचे हफ्ते माफ करण्यासाठी रिक्षा चालकांचे आंदोलन

महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार काँग्रेसच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालक, मालकांची पिंपरी येथे निदर्शने. Rickshaw Drivers Demand Waiver In Loan EMI

एमपीसी न्यूज – सरकारने ऑटो रिक्षा चालक, मालकांना विशेष आर्थिक पॅकेज जाहिर करावे. रिक्षा खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते व व्याज सहा महिन्यांसाठी माफ करावे या आणि इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार काँग्रेसच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालक, मालकांनी आज (मंगळवारी) पिंपरी येथे निदर्शने केली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन केंद्र व राज्य सरकारने 25 मार्च 2020 पासून लॉकडाऊन केले. या लॉकडाऊन काळात राज्यातील ऑटो रिक्षा चालक व मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

याबाबत राज्य सरकारने ऑटो रिक्षा चालक, मालकांना विशेष आर्थिक पॅकेज जाहिर करावे, अशी मागणी असंघटीत कामगार काँग्रेस शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी यावेळी केली.

आंदोलनानंतर शिष्टमंडळांने नायब तहसिलदार यांना निवेदन दिले. लॉकडाऊनमुळे अल्प उत्पन्न गटातील नागरिकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. ऑटो रिक्षा चालक, मालकांची रोजी रोटी प्रवाशांवर अंवलबून आहे.

अनलॉक काळात देखील रिक्षातून प्रवाशी वाहतूक करताना कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे अनलॉक काळात रिक्षा सुरु करुन देखील उत्पन्न मिळत नाही. कुटुंबाचा चरीतार्थ चालविणे अवघड झाले आहे.

आर्थिक विवंचनेतून राज्यात चार रिक्षा चालकांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या कुटुंबाना राज्य सरकारने प्रत्येकी दहा लाख रुपये अनुदान द्यावे.

तसेच रिक्षा खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते व व्याज सहा महिन्यांसाठी माफ करावे. यासाठी केंद्र सरकारने सर्व राष्ट्रीयकृत बॅंका, सहकारी बँका, वित्तीय महामंडळ, खाजगी फायनास कंपन्यांना आदेश द्यावेत.

रिक्षा चालक, मालकांसाठी कायम स्वरुपी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.