Pimpri: रिंग झालेल्या रस्ते साफसफाईच्या 647 कोटींच्या कंत्राटात भाजप-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची भागीदारी ?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफसफाई कामाच्या विभागलेल्या निविदेत सहा पॅकेजसाठी सहा कंत्राटदारांनीच आलटून पालटून सहभाग घेतल्याचे तांत्रिक छाननीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे 647 कोटी रुपयांच्या या कंत्राटात रिंग झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. त्यामध्ये सत्ताधारी भाजप आणि विरोधातील राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांची भागीदारी असल्याची चर्चा आहे. दरम्यान, यांत्रिकी पध्दतीने काम केल्यास 1100 कामगार बेरोजगार होणार आहेत.

महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या रस्त्यांची तसेच मुंबई – पुणे महामार्गाच्या दुतर्फा रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने दैनंदिन साफसफाई करण्यात येणार आहे. त्यासाठी मेसर्स टंडन अर्बन सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड यांची 24 ऑगस्ट 2018 रोजी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. आजमितीला 863 किलोमीटर रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाई सुरु आहे. मात्र, नव्या निविदेत 1 हजार 670 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची साफसफाई करण्याचे नियोजन करण्यात आले. या कामासाठी एक संयुक्त निविदा न काढता सहा विविध ‘पॅकेजेस’ मध्ये विभागणी करत 8 वर्ष कालावधीसाठी निविदा काढण्याची शिफारस सल्लागाराने केली.

नऊ मीटर आणि त्यापेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्यात येईल. जास्त वर्दळीच्या भागांमध्ये दिवसांतून दोनदा तर इतर भागांमध्ये दररोज साफसफाई केली जाईल. पुढील 8 वर्षांसाठी 602 कोटी 12 लाख एवढा खर्च येईल असे सल्लागाराने सांगितले. परंतु, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सल्लागाराच्या शिफारशींमध्ये फेरबदल केले. सुधारित निविदेची रक्कम 646 कोटी 53 लाख एवढी करत वाहनांची संख्या 51 आणि कामगारांची संख्या 706 निश्चित केली. तसेच निविदेचा कालावधी 7 वर्षे करण्यात आला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 25 सप्टेंबरपूर्वी निविदा प्रसिध्द करण्यात आली. दोन – तीन महिने मुदतवाढ दिली गेली होती.

नुकतीच ही निविदा उघडण्यात आली असून तांत्रिक छाननीमध्ये मोजक्याच कंत्राटदारांनी भाग घेतल्याचे स्पष्ट झाले. ‘अ’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांसाठी 6 जणांनी, ‘ब’ आणि ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांसाठी 5 जणांनी, ‘क’ आणि ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयांसाठी 5 जणांनी ‘ग’ आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांसाठी 6 जणांनी तर पुणे – मुंबई रस्त्यांसाठी 5 जणांनी आणि मुंबई – पुणे रस्त्यासाठी 6 जणांनी निविदा भरल्याचे उघड झाले. ग्लोबल टेंडर प्रसिध्द करुनही निवडक सहा कंत्राटदारांनीच निविदा प्रक्रियेत भाग घेतला. कोणतीही स्पर्धा न होता संगनमत झाल्याचे यातून स्पष्ट होते. यामध्ये सत्ताधारी भाजप पदाधिकारी आणि विरोधातील राष्ट्रवादीचे पिंपरीतील लोकप्रतिनीधी आणि काही सन्माननीयांची भागीदारी असल्याची जोरदार चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.