Pimpri : नदी प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका करणार पवना, इंद्रायणीचे ‘सीमांकन’

एमपीसी न्यूज – औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नद्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. नद्यांना प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी महापालिकेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. दूषित पाणी नदीत मिसळू न देण्यासाठी महापालिका उपाययोजना करीत असून त्यासाठी पवना आणि इंद्रायणी नद्यांचे ‘सीमांकन’ केले जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात औद्योगिक वसाहतींसह नागरी वसाहतींचे देखील प्रमाण मोठे आहे. त्यामुळे औद्योगिक परिसरातून निघणारे आणि नागरी भागातून निघणारे दूषित पाणी नद्यांमध्ये मिसळले जात आहे. कोणतीही प्रक्रिया न करता थेट पाणी नद्यांमध्ये मिसळल्यामुळे शहरातून वाहणा-या नद्या अतिशय प्रदूषित झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातून पवना आणि इंद्रायणी या दोन नद्या वाहतात. या नद्यांच्या स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासन नद्यांचे सीमांकन निश्चित करीत आहे.

या उपक्रमाअंतर्गत नद्यांच्या सीमेची मूळ आखणी केली जाणार आहे. नद्यांच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी काही ठिकाणी नद्यांच्या परिसरात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे महापालिकेकडून मागील काही दिवसांपूर्वी संबंधित नागरिक आणि रहिवासी सोसायट्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. मंगळवार (दि. 24) पासून नागरिकांना बोलावून त्यांच्या समक्ष नद्यांच्या मूळ पात्राची आखणी केली जाणार आहे.

पवना नदी पिंपरी-चिंचवड शहराच्या किवळे, पुनावळे, ताथवडे, थेरगाव, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपरी, चिंचवड, दापोडी या भागातून जाते. पवना नदीवर सुमारे 24 किलोमीटरच्या परिसरात ही आखणी केली जाणार आहे, तर इंद्रायणी नदी पिंपरी-चिंचवड शहराच्या तळवडे, चिखली, डुडुळगाव, मोशी, च-होली या भागातून जाते. इंद्रायणी नदीची एक बाजू पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आहे. त्यामुळे या नदीवरील सुमारे 18 किलोमीटरच्या परिसरात सीमांकन केले जाणार आहे.

सीमांकन केल्यानंतर एका पाईप लाईनद्वारे शहरातून जमा होणारे अशुद्ध सांडपाणी जमा करून जवळच्या मैला शुद्धीकरण केंद्रात पाठवले जाईल. तिथे त्यावर प्रक्रिया करून नंतर ते पाणी नदीत सोडले जाणार आहे. तर औद्योगिक परिसरातून येणा-या पाण्यासाठी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (ईटीपी) बसवण्यात येणार आहे. यामुळे नदीचे प्रदूषण कमी होणार आहे. महापालिकेने यासाठी 32 लाख रुपये संबंधित विभागाला दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.