Pimpri – पवनामाईच्या आरतीने भारतीय नदी दिवस सप्ताहाची सांगता

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचा उपक्रम

एमपीसी न्यूज – मागील दीड वर्षापासून प्रत्यक्ष नदीवर काम करणा-या रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने नदी प्रेमींना एकत्रित घेऊन भारतीय नदी दिवसानिमित्त 22 ते 28 नोव्हेंबर दरम्यान नदी स्वच्छता सप्ताह साजरा केला. यामध्ये विविध उपक्रमातून नदी स्वच्छता केली. प्रत्यक्ष नदी स्वच्छतेबरोबर नदीचे महत्व पटवून देत नागरिकांचा सहभाग आणि जबाबदारी देखील त्यांना पटवून देण्यात आली. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने अथक परिश्रमातून पवना नदीला जलपर्णीमुक्त केले आहे. नदी दिवस सप्ताहाचा समारोप पवना नदीच्या आरतीने झाला.

पवना नदीच्या आरतीसाठी प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेविका अर्चना बारणे, मनिषा पवार, सामाजिक कार्यकर्ते तानाजी बारणे, जयदीप माने, हरिष मोरे, खिवसरा पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक नटराज जगताप, पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे डोके, दीपक पालांडे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, भावसार व्हिजनचे राजीव भावसार, रानजाई प्रकल्प देहूचे सोमनाथ मुसुडगे, देश का सच्चा हिरो चंद्रकांत राधाबाई कुलकर्णी, पोलीस नागरिक मित्र संघटना, अंघोळीची गोळी, खिळे मुक्त झाडे संघटना, शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन, थेरगाव सोशल फाऊंडेशनचे सर्व सभासद तसेच रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे सर्व सभासद उपस्थित होते.

विविध सामाजिक संघटनांना बरोबर घेऊन त्या माध्यमातून नदीची व्यथा सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी ला यश आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय नदी दिवसाचे (28 नोव्हेंबर) औचित्य साधून पिंपरी-चिंचवड भागात नदी दिन सप्ताह साजरा करण्यात आला. परिसरातील फत्तेचंद जैन विद्यालय चिंचवड, अमृता विद्यालय निगडी, ज्ञान प्रबोधिनी शाळा निगडी, ज्युडसन स्कूल आकुर्डी, क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल रावेत, मातृ विद्यालय आकुर्डी यांसारख्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी नदी स्वच्छतेची प्रतिज्ञा केली.

अमृता विद्यालयातील शंभर विद्यार्थ्यांनी दोन दिवस प्रत्यक्ष घाटांवर हजर राहून नदीची व्यथा आणि प्रदूषणाची कारणे विस्तृतपणे समजावून घेतली. तिथेच त्यांनी नदी संवर्धनाची प्रतिज्ञा देखील घेतली. या सप्ताहाची सांगता बुधवारी (दि. 28) केजुबाई बंधारा येथे दीपोत्सव आणि नदीची आरती करून झाली. यावेळी घाटावर दिवे लावण्यात आले. सुरेल संगीत आणि पारंपरिक वाद्य संबळाने वातावरणात रोमांच उत्पन्न केला. त्यानंतर झालेल्या पवनामाईच्या आरतीत सुमारे चारशे लोक सहभागी झाले.

कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि पवना जल मैत्री अभियान या संघटनांनी केले. सूत्रसंचालन रो. सचिन काळभोर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.