Pimpri: शहरात सर्वत्र रस्त्यांची खोदाई; खोदलेल्या रस्त्यांमुळे शहरवासिय हैराण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सगळीकडे रस्त्यांची खोदाई केली जात आहे. अमृत योजनेअंतर्गत चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकणे, जलनि:सारणाची कामे, भुमिगत गटारे आणि विविध केबल डक्टसाठी शहरात सर्वत्र खोदाई केली आहे. रस्ते खोदल्यामुळे नागरिकांना चालणे देखील मुश्किल होत आहे. खोदाई केल्यानंतर खड्डे व्यवस्थितरित्या बुजविले जात नाहीत. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खोदलेल्या रस्त्यांमुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण झाले आहेत.

पावसाळा संपल्यानंतर दरवर्षी महापालिकेकडून खासगी मोबाईल कंपन्या आणि शासकीय यंत्रणांना विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यासाठी रस्ते खोदाई करण्यास मान्यता देण्यात येते. खासगी संस्थांकडून महापालिका खोदाई शुल्क घेते. महावितरण, पाणीपुरवठा, ड्रेनेजसाठी, वीजपुरवठा, टेलिकम्युनिकेशन, गॅस, ‘सीसीटीव्ही’, इंटरनेट आदी सेवांसाठी सातत्याने खोदाई केली जाते. खासगी कंपन्यांकडून सेवा पुरविण्यासाठी रस्त्यांची खोदाई करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, रस्ते खोदाईसाठी प्रत्यक्षात मान्यता दिलेल्या रस्त्यांच्या लांबीपेक्षा अधिक बेकायदा रस्ते खोदाई केली जाते.

पिंपरी-चिंचवड शहराच्या संपूर्ण भागात खोदाई केली आहे. अनेक ठिकाणी खोदाईची कामे सुरु आहेत. पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकणे, जलनि:सारणाची कामे, भूमिगत गटारे आणि विविध केबल डक्टसाठी शहरात सर्वत्र खोदाई केली आहे. डांबरीकरणाचे रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खोदाई केल्यानंतर खड्डे बुजविले गेले नाहीत. खड्डे व्यस्थितरित्या बुजविले जात नसून अर्धवट ठेवले जात आहेत. निगडी येथील मधुकर पवळे पुलाच्या बाजूला खोदाई केल्यानंतर रस्ता पुर्णपणे बुजविला नाही. मातीचे ढीग हटविले नाहीत. त्यामुळे नागरिकांना चालणे मुश्किल होत आहे. तसेच वाहतूक कोंडीत देखील भर पडत आहे.

पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे महापालिकेने खोदाई करणा-या खासगी कंपन्यांकडून रस्ते पूर्ववत करुन घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वीच खड्डे बुजविणे गरजेचे आहे. खोदाई केलेले रस्ते खासगी कंपन्यांकडून व्यवस्थित बुजवून घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याबाबत महापालिकेचे उपअभियंता विजय भोजने म्हणाले, ”अमृत योजनेअंतर्गत चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकणे, जलनि:सारणची कामे, भूमिगत गटारे आणि विविध खासगी केबल डक्टसाठी खोदाईस महापालिकेने परवानगी दिली होती. 15 मे पर्यंत खोदाई पूर्ण करायची होती. महापालिकेने 31 मे पर्यंत रस्ते पूर्ववत करायचे आहेत. याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांची असून शहर अभियंता कार्यालयाने क्षेत्रीय कार्यालयांना सूचना दिल्या आहेत. 31 मे पर्यंत सर्व रस्ते पुर्ववत करण्यास सांगितले आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like